राष्ट्रीय फुटबॉलपटूचा भीषण अपघात, भरधाव कारने धडक देत फरफटत नेलं; आरोपी अद्याप फरार
Dombivli Accident: डोंबिवलीतील प्रसिद्ध धावपटू आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप (Laxman Gundap) यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात (Accident) गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी त्यांच्यावर मोठा खर्च होत आहे. विशेष म्हणजे या अपघाताला जबाबदार असलेला कारचालक अद्याप फरार असून, टिळकनगर पोलीस त्याला शोधण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लक्ष्मण गुंडप हे डोंबिवली पूर्वेतील महात्मा गांधीनगर परिसरात राहतात. ते एक सुप्रसिद्ध धावपटू असून, राष्ट्रीय स्तरावर त्यांनी फुटबॉलमध्ये आपली छाप उमटवली आहे. सध्या ते अनेक तरुणांना मोफत प्रशिक्षण देत असून, शहरातल्या क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
Dombivli Accident: अपघात कसा घडला?
काही दिवसांपूर्वी, गुंडप आपल्या मुलासह जिमखाना रोडमार्गे क्रीडांगणाकडे जात असताना हा अपघात घडला. त्यांचा मुलगा सायकलवर होता आणि गुंडप स्वतः दुचाकीवर होते. यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव कारने प्रथम मुलाला, आणि नंतर गुंडप यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर संबंधित कारचालकाने दोघांनाही सुमारे 15 ते 20 मीटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत गुंडप यांच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाली असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Dombivli Accident: उपचाराचा खर्च वाढीव
गुंडप यांच्या पायाच्या उपचारांवर आतापर्यंत सुमारे 5 लाख रुपयांचा खर्च झाला असून, पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी त्यांना किमान 10 महिने पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या कालावधीत ते कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकणार नाहीत, आणि त्यांचे सामाजिक कार्य देखील थांबले आहे.
Dombivli Accident: पोलिसांचा तपास अपयशी
या गंभीर अपघाताला अनेक दिवस उलटून गेले असले तरी, टिळकनगर पोलीस अद्यापही अपघातातील कारचालकाला पकडू शकलेले नाहीत. पोलिसांनी संबंधित कारचा क्रमांक मिळाल्याचा दावा केला असला, तरी “चालक सापडत नाही,” असे सांगण्यात येत आहे. यावर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Dombivli Accident: गुंडप यांची मागणी
दरम्यान, डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी अपघात करणाऱ्या कारचा शोध घेतला नसल्याने गुंडप यांनी संताप व्यक्त केला आहे. “रस्त्यावर दररोज अनेक मुले सरावासाठी ये-जा करतात. अशा बेदरकार वाहनचालकांमुळे त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे. त्यामुळे संबंधित कारचालकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी गुंडप यांनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.