Beer And Mosquitoes: …म्हणून बिअर पिणाऱ्यांना चावतात जास्त डास; कारण ऐकून व्हाल थक्क
बऱ्याचदा आपल्याला असे दिसून येते की काही जणांना जास्त डास चावतात. यामागे अनेक कारणे असल्याचे म्हंटले जाते. जसे की, मानवी त्वचेतील बॅक्टेरियातून युरिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड आणि अमोनिया हे घटक बाहेर पडतात. या घटकांच्या वासामुळे डास माणसांना चावतात. मात्र आता विशेष सांगायचे म्हणजे एका संशोधनातून असे समोर आलं आहे की, बिअर पिणाऱ्यांना जास्त प्रमाणात डास चावतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की यामागे नेमकं कारण काय? तेच आपण जाणून घेऊया… ( Does Beer Attracts Mosquitoes? )
कोणी केले संशोधन? (डासांवर नेदरलँड रिसर्च)
नेदरलँड्समध्ये शास्त्रज्ञांनी सर्वात प्रसिद्ध असलेल्या एका संगीत महोत्सवात सहभागी झालेल्या ५०० जणांवर संशोधन केले. यावेळी असे आढळून आलं की, ज्यांनी बिअर घेतली आहे त्यांना तब्बल ३४ टक्के जास्त प्रमाणात डास चावतात. तसेच ज्यांनी सनस्क्रीन लावले किंवा नुकतीच अंघोळ केली असेल त्या लोकांना कमी प्रमाणात डास चावतात असेही समोर आलं आहे.
दारू पिणाऱ्यांना का चावतात डास?
हे संशोधन शास्त्रज्ञ फेलिक्स होल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. त्यांच्या मते, माणसाच्या शरीरातून येणाऱ्या वासामुळे आणि तापमानामुळे डास माणसांना चावत असतात. आता जेव्हा एखादा व्यक्ती खूप दारू पिते तेव्हा तो अति उत्साहाने बोलायला लागतो, नाचायला लागतो. त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढते आणि जास्त घामही येतो. त्यामुळे अशा व्यक्तींकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात.
शास्त्रज्ञांचा इशारा
दरम्यान, या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, डास चावल्याने खाज सुटणे आणि जळजळ होणे तसेच डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे, जर तुम्ही नियमितपणे बिअर किंवा दारूचे सेवन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की, बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही सनस्क्रीन लावा, डास प्रतिबंधक क्रीम लावा.
Comments are closed.