गौतम गंभीरच्या डिनर पार्टीत हर्षित राणाची खास एन्ट्री, टीम बसने आली पण हेड कोचचा लाडका कारने पोहोचला

वेस्ट इंडिजविरुद्ध 10 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी गौतम गंभीरने त्याच्या दिल्लीतील निवासस्थानी खास डिनर पार्टीचे आयोजन केले. 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, आणि सपोर्ट स्टाफ बसने गंभीरच्या घरी पोहोचले.

या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते हर्षित राणाने. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग नसताना देखील या खासगी पार्टीसाठी हजर होता. विशेष म्हणजे, हर्षित राणा टीम बसने नव्हे, तर स्वतःच्या खासगी कारमधून थेट गंभीरच्या घरी पोहोचला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

हर्षित राणा आणि गौतम गंभीर दोघेही दिल्लीतले असल्यामुळे गंभीरने त्याला वैयक्तिकरित्या आमंत्रित केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अलीकडेच हर्षितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्याने, आणि त्यावरून ‘गंभीरचा लाडका’ अशी चर्चा सुरू असल्याने, या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

गंभीर यांच्या डिनर पार्टीला भारतीय संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक मंडळी, सपोर्ट स्टाफ तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. खेळाडू या पार्टीला सामान्य पोशाखात आले होते. बहुतांश जण पांढऱ्या टी-शर्टमध्ये होते, मात्र शुबमन गिलने मात्र वेगळेपण जपताना ‘अमीरी’ ब्रँडची खास रंगाची टी-शर्ट परिधान केली होती.

गंभीरने या पार्टीसाठी कोणता खास मेन्यू ठेवला होता याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, सर्व खेळाडूंनी डिनर घेतल्यानंतर पुन्हा टीम बसने हॉटेलकडे परत प्रवास केला.

ही पार्टी जरी अनौपचारिक असली, तरीही त्यात झालेली हर्षित राणाची खास उपस्थिती आणि त्याची वेगळी एन्ट्री यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गंभीरची प्रशिक्षण भूमिकेतील भूमिका लवकरच अधिकृत होणार असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अशा हालचालींना विशेष महत्त्व दिले जात आहे.

Comments are closed.