Health Tips: करपलेली चपाती, कुरकुरीत ब्रेड खाणं आरोग्यासाठी धोकादायक
भारतीय घरात चपाती म्हणजे रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, ऑफिसचा डबा सर्वत्र चपाती असतेच. पण हीच चपाती जर चुकीच्या पद्धतीनं बनवली, तर ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. अलीकडच्या संशोधनांनुसार, जास्त भाजलेली किंवा करपलेली चपाती, ब्रेड आणि तंदुरी पदार्थांमुळे शरीरात कॅन्सर निर्माण करणारे घटक तयार होऊ शकतात. (roti bread cancer risk acrylamide)
कसा निर्माण होतो हा धोका?
चपाती किंवा ब्रेड जेव्हा खूप जास्त तापमानावर भाजले जातात, तेव्हा त्यातून ‘एक्रिलामाइड’ (Acrylamide) नावाचं रासायनिक संयुग तयार होतं. हे घटक दीर्घकाळ शरीरात साचल्यास डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढते.
तसंच, गॅसवर थेट भाजताना चपातीच्या पृष्ठभागावर काळे डाग तयार होतात. हे काळे भाग म्हणजेच कार्सिनोजेनिक म्हणजेच कॅन्सर वाढवणारे पदार्थ. म्हणूनच चपाती “गोल्डन ब्राऊन” रंगाची झाली की गॅसवरून उतरवावी.
संशोधनातून काय समोर आलं?
‘न्युट्रिशन अँड कॅन्सर’ या जर्नलमधील संशोधनात सांगण्यात आलं की, जास्त तापमानावर शिजवलेले पदार्थ जसे की चपाती, ब्रेड, फ्रेंच फ्राईज यामध्ये एक्रिलामाइड तयार होतो. तर ‘एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, गॅस आणि कुकटॉपमधून उत्सर्जित होणारे नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड हे वायू दीर्घकाळ श्वासोच्छ्वासात गेले तर श्वसनविकार, हृदयाचे आजार आणि अगदी कॅन्सरचाही धोका वाढवू शकतात.
काय काळजी घ्यावी?
चपाती गॅसवर थेट जाळू नका; तव्यावरच हळू शेकवा, चपातीवर काळे डाग पडू देऊ नका, करपलेला ब्रेड किंवा रोटी खाणं टाळा, बेकरी पदार्थ ‘गोल्डन ब्राऊन’ रंगाचे असावेत; काळसर झाल्यास त्यातील भाग काढून टाका, रोजच्या आहारात मल्टीग्रेन ब्रेड आणि पूर्ण गव्हाची चपाती वापरा, शक्य असल्यास घरातील गॅस शेगडीजवळ योग्य वायुवीजन ठेवा.
ब्रेड आणि रोटीचा योग्य वापर
आरोग्यासाठी ब्रेड किंवा चपाती पूर्णपणे टाळणं गरजेचं नाही, पण ते मर्यादेत आणि योग्य पद्धतीने बनवणं अत्यावश्यक आहे.व्हाईट ब्रेड किंवा बनावट ब्राऊन ब्रेडऐवजी मल्टीग्रेन ब्रेड वापरणं चांगलं. आणि रोटी शेकताना “गोल्डन ब्राऊन” रंगावरच थांबणं हीच आरोग्यदायी सवय आहे.
Comments are closed.