मुशीर खानवर बॅट उगारल्याने पृथ्वी शॉवर कारवाई होणार? माजी क्रिकेटपटूच्या हाती निर्णय

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यामध्ये तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. हा सामना अनिर्णीत सुटला मात्र, पृथ्वी शॉ आणि मुशीर खानमुळे हा सामना सध्या चर्चेत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वी शॉ (181) आणि अर्शिन कुलकर्णीने (186) दमदार फलंदाजी केली. पृथ्वी शॉ ला मुशीर खानने बाद केले आणि स्टेडियमवर दंगा झाला. पृथ्वी शॉने मुशीर खानवर बॅट उगारली. त्यामुळे काही वेळासाठी मैदानातलं वातावरण गरम झालं होतं. या प्रकाराची मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दखल घेतली आहे. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर याप्रकरणी अंतिम निर्णय घेणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी (16 ऑक्टोबर 2025) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीची मिटींग होणार आहे. या मीटिंगमध्ये मुंबईचा कर्णधार, प्रशिक्षक, आणि खेळाडूंना घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करण्यात येणार आहे. या मीटिंगमध्ये या सर्व प्रकाराची माहिती मिळेल आणि त्यानंतर दिलीप वेंगसरकर या प्रकरणी खेळाडूंशी बोलून अंतिम निर्णय घेतील. याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी काही चुकीचे आढळल्यास पृथ्वी शॉ आणि मुशीर खान यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलं आहे. खेळाडूंमध्ये शिस्त असणे हा महत्त्वाचा पैलू असल्याचं महराष्ट्र क्रिकेट असोसिशनचे सचिव अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रारंभ रोमॅण्टिक, पण शेवट कडू

सामन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने दमदार फलंदाजी करत 220 चेंडूंचा सामना 21 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 181 धावांची खेळी केली. मुशीर खानने त्याला बाद केलं. मात्र त्यानंतर तंबूत परतत असताना पृथ्वीने मुशीर खानवर बॅट उगारली आणि दोघांमध्ये वाद झाला. काही काळ मैदानामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पंचांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.

Comments are closed.