आरक्षणाच्या रक्षणासाठी कुणबी रस्त्यावर, आझाद मैदानावर धडक! मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका!!

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी कुणबी समाजाने आज रस्त्यावर उतरून थेट आझाद मैदानावर धडक दिली. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी करीत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘ओबीसी आरक्षण अबाधित ठेवा’, ‘मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नका’, ‘मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका’ अशा  गगनभेदी घोषणांनी मैदान दणाणून गेले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले होते. यावेळी लाखो मराठा बांधव मुंबईत धडकले होते. यानंतर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 58 लाख मराठी कुणबी नोंदी सापडल्याने 58 लाख मराठे ओबीसीत समाविष्ट होणार आहेत, मात्र ओबीसी समाजातून या निर्णयाला विरोध होत आहे. ओबीसी प्रवर्गात 350 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच स्तरांवर स्पर्धा वाढेल अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे, दरम्यान ओबीसी प्रवर्गातील मूळ कुणबी समाजानेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

कुणबी समाजाचे नेते अशोक वालम यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. ‘ज्या दिवशी हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय काढला तो 2 सप्टेंबरचा काळा दिवस आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास नसतानासुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदींमध्ये दिलेले बोगस जातीचे दाखले तत्काळ रद्द करण्यात यावेत. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आणि मराठ्यांच्या दबावाखाली पुनः पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तत्काळ बरखास्त करण्यात यावी,’ अशी मागणी  वालम यांनी केली.

गांधी टोप्या आणि पारंपरिक वेशभूषा

कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे  कुणबी समाजाने आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढला. मुंबई,  ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. काही कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर ‘जय कुणबी’ लिहिलेल्या गांधी टोप्या घालून, हातात निषेधाचे फलक घेऊन मैदानावर दाखल झाले. आझाद मैदानावर मोठं व्यासपीठ आणि मंडप उभारण्यात आला होता.

सरकारने घेतली आंदोलनाची दखल

या आंदोलनाची सरकारला अखेर दखल घ्यावी लागली. काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात जाऊन सरकारच्या वतीने आंदोलकांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेतली असून येत्या आठ दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल,  असे आश्वासन मंत्री लोढा यांनी आंदोलकांना यावेळी दिले.

अशा आहेत मागण्या

सरकारने शोधलेल्या 58 लाख मराठाकुणबी नोंदी तत्काळ रद्द कराव्यात?

मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती बरखास्त करा.

ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करून नोकऱ्यांमधील अनुशेष भरा.

जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करा.

कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा? अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल!अनिल नवगेन, अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ

Comments are closed.