रोहित-विराटची कारकीर्द वेळेपूर्वी संपवल्याचा ठपका, बीसीसीआयचा आगरकरांबाबत मोठा निर्णय

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवडीवरून चाहत्यांमध्ये टीकेची झोड उठली असतानाच, आता बीसीसीआयने त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला मिळालेल्या सातत्यपूर्ण यशामुळे बीसीसीआयने त्यांच्या कार्यकाळात वाढ करत त्यांना 2026 पर्यंत मुख्य निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अजीत आगरकर यांनी 2023 मध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरी गाठली, तर त्यानंतर 2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या यशस्वी पर्वामुळे बीसीसीआयने त्यांच्या कार्यशैलीवर शिक्कामोर्तब करत त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय प्रगती केली आहे.”

सध्या कार्यरत निवड समितीत अजीत आगरकर यांच्यासह एस. एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरत यांचा समावेश आहे. मात्र येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या AGM नंतर या समितीत बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः शरत यांना वगळण्याचा विचार सुरु असून इतर सदस्यांच्याही भूमिकांवर पुनर्विचार होऊ शकतो.

याशिवाय महिला आणि कनिष्ठ गटांच्या निवड समित्यांमध्येही लवकरच फेरबदल होण्याची चिन्हं आहेत. महिला निवड समितीतील नीतू डेव्हिड, आरती वैद्य आणि मिंटू मुखर्जी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून बीसीसीआय लवकरच नव्या सदस्यांसाठी अर्ज मागवणार आहे.

या पार्श्वभूमीवर आगरकर यांच्यावर अधिक जबाबदारी येणार असून, आगामी निवडीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Comments are closed.