जेनेरिक औषधे टॅरिफमुक्त, ट्रम्प यांच्याकडून हिंदुस्थानला मोठा दिलासा

अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प सरकारने मागे घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील जेनेरिक औषधांच्या आयातीत 50 टक्के वाटा असलेल्या हिंदुस्थानला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या औषधांवर अवलंबून असलेल्या अमेरिकी नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे.
उच्च रक्तदाब, नैराश्य, अल्सर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांशी झुंजणारे अमेरिकेतील लाखो नागरिक हिंदुस्थानातील आयात केलेल्या जेनेरिक औषधांवर अवलंबून आहेत. ट्रम्प यांच्या 100 टक्के टॅरिफच्या निर्णयामुळे ते टेन्शनमध्ये आले होते. अमेरिकेतील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार हिंदुस्थान आहे. आयक्यूव्हीआयए या जागतिक डाटा अॅनालिस्ट पंपनीच्या माहितीनुसार अमेरिकेतील एकूण जेनेरिक प्रिस्क्रिप्शनपैकी 47 टक्के औषधे हिंदुस्थानची असतात. अमेरिकेतील जेनेरिक औषधांच्या निर्मितीपेक्षाही हे प्रमाण जास्त आहे.
‘व्हाइट हाऊस’मध्येच मतभेद
औषधांवर टॅरिफ लावण्याच्या निर्णयावरून व्हाइट हाऊसमधील अतिउजव्या आणि स्थानिक नीती परिषदेच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद होते. अमेरिकेत औषध निर्मितीला चालना देण्यासाठी विदेशी औषधांवर जबर टॅरिफ लावला जावा असे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ गटाचे म्हणणे होते. तर तसे केल्यास अमेरिकेत औषधांच्या किमती वाढतील व औषधांची टंचाई निर्माण होईल. तसेच हिंदुस्थानी जेनेरिक औषधे इतकी स्वस्त आहेत की त्यावर टॅरिफ लावला तरी ती अमेरिकेतील औषधांच्या तुलनेत स्वस्तच असतील. त्यामुळे याचा फारसा फायदा होणार नाही, असे नीती परिषदेचे म्हणणे होते. त्यातून नवा निर्णय झाल्याचे समजते.
Comments are closed.