‘एमओए’च्या आखाड्यात दादांविरुद्ध आण्णा? राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगण्याची शक्यता

एरवी एकतर्फी वातावरणात पार पडणारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनची (एमओए) निवडणूक यंदा रंगतदार होण्याची चिन्हे दिसतायेत. कारण ‘एमओए’चे विद्यमान अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेदेखील अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अजितदादा विरुद्ध मुरली आण्णा यांच्यातील तुल्यबळ लढतीमुळे एमओएच्या निवडणुकीचा आखाडा गाजण्याची शक्यता आहे
यंदाच्या एमओएच्या निवडणुकीत राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. 2013पासून आतापर्यंत अजित पवार तीन वेळा ‘एमओए’चे अध्यक्षपद म्हणून कार्यरत राहिले आहेत. आता ते चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र आज (दि.10) सकाळी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हेदेखील ‘एमओए’च्या निवडणुकीत अध्यक्षपदाचा फॉर्म भरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पुण्याचे खासदार विरुद्ध पुण्याचे पालकमंत्री यांच्यातील ‘एमओए’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर महाराष्ट्रासह देशाच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष असणार आहे. 11 ऑक्टोबर ही निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून 2 नोव्हेंबरला पुण्यात ही निवडणूक रंगणार आहे.
नामदेव शिरगावकर, चंद्रकांत जाधव यांचे अर्ज
‘एमओए’च्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यासह इतर व्यक्तींनीही अर्ज दाखल केला. यामध्ये नामदेव शिरगावकर पुन्हा महासचिव पदासाठी असून चंद्रकांत जाधव यांनी खजिनदारपदासाठी अर्ज भरला आहे. याचबरोबर अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये बाबुराव चांदेरे, प्रदीप गंधे, स्मिता शिरोळे, संजय वळवी, मनोज भोरे, संदीप ओंबासे व रणधीर यांच्या नावाचा समावेश आहे.
खाली? 'चेहरा'चा अंदाज खरा ठरणार!
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा आगामी अध्यक्ष हा खेळाडूच असेल, असे वक्तव्य भाजपच्या क्रीडा आघाडीचे प्रमुख संदीप भोंडवे व ‘हिंद केसरी’ योगेश दोडके यांनी मागील महिन्यात ‘एमओए’विरुद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान केले होते. त्यावेळी दै. ‘सामना’ने 26 सप्टेंबरच्या अंकात ‘एमओए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यात रंगणार असल्याचे वृत्त दिले होते. कारण मोहोळ स्वतः कुस्तीपटू असल्याने त्यांचेही नाव ‘एमओए’च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत येणार हा आमचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ शुक्रवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Comments are closed.