मालिका विजयोत्सवाची ‘दिल्ली’ समीप, कोटलावर आजपासून हिंदुस्थानची दुसरी कसोटी, ‘कमकुवत’ विंडीजचा धुव्वा उडवण्यासाठी यजमान सज्ज

मायदेशात सलग  12 वर्षांत 18 मालिका जिंकल्यानंतर हिंदुस्थानच्या विजयाची सवय न्यूझीलंडने मोडत जबर धक्का दिला होता. आता तब्बल वर्षभरानंतर हिंदुस्थानचा संघ कोटल्यावर मालिका विजयाची दिल्ली गाठण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. कमकुवत विंडीजविरुद्ध सुरू होणारा कसोटी सामनाही तीन-चार दिवसांतच जिंकत मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवण्याचे ध्येय शुभमन गिलच्या संघाने समोर ठेवले आहे.

हमखास विजय असलेल्या या कसोटीत गिल विजयी संघ कायम ठेवणार की बेंचवर असलेल्या युवा फलंदाजांना संधी देण्याचे धाडस देत विंडीजलाही कसोटीत दम भरण्याची संधी देणार, याकडेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. विंडीजचा संघ अत्यंत दुबळा निघाल्यामुळे या मालिकेला आणि कोटला कसोटीलाही फारसे महत्त्व उरलेले नाही. हिंदुस्थानने कसोटीत रंगत भरण्यासाठी विंडीजच्या तोडीचाच आपला युवा संघ मैदानात उतरवायला हवा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

कोटलाची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल

दिल्लीतील कोटलाची खेळपट्टी ही काळय़ा मातीची असून फलंदाजांना शॉट खेळण्यासाठी उत्तम आहे. जर हिंदुस्थानने पहिल्यांदा फलंदाजी घेतली तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील शीर्षक्रम पुन्हा एकदा वेस्ट इंडीजच्या क्लबस्तरीय गोलंदाजीचा फडशा पाडण्यास तयार आहे. पहिल्या कसोटीत पॅरिबियन गोलंदाजांपैकी फक्त जेडन सील्सच काही प्रमाणात प्रभावी ठरला होता.

हिंदुस्थानी संघाला आव्हान देणारे खेळाडूच विंडीजकडे नसल्यामुळे ते केवळ प्रतिष्ठा वाचवण्याच्या प्रयत्नात असतील. पण दिल्लीच्या असह्य उन्हात धडाडीच्या गिल सेनेसमोर त्यांची ती झुंज किती काळ टिकते, हेच औत्सुक्याचे आहे.

बुमराला मिळणार विश्रांती?

या कसोटीनंतर हिंदुस्थानचा दौरा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याच्या वर्पलोडबाबत नेहमीच चर्चा रंगत असते, मात्र बुमरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत नाही, तो फक्त टी-20 सामन्यांत खेळणार आहे.

तीन दिवसांतच कसोटीचा गेम

अहमदाबादमध्ये अवघ्या अडीच दिवसांतच विंडीजचा खेळ संपला होता. आता दिल्लीतही तोच खेळ रंगणार आहे. कसोटीपूर्वी झालेल्या बैठकीनुसार दुसऱया कसोटीतही अहमदाबादचे खेळाडू मैदानात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. जर तोच संघ दिल्लीत खेळला तर कसोटीचा फैसला पुन्हा तिसऱयाच दिवशी लागणार, हे स्पष्ट आहे.

विंडीज आव्हान देऊ शकेल का?

हिंदुस्थानकडे प्रतिभावान क्रिकेटपटूंचा असा ताफा आहे की, त्यातील कोणताही खेळाडू जगातील पुठल्याही संघात स्थान पटकावू शकतो. त्याच्या तुलनेत वेस्ट इंडीजकडे अनुभवहीन, कमपुवत आणि विस्कळीत संघ आहे. कधी काळी जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱया विंडीजच्या खेळाडूंना आज जगभरातील टी-20 लीगमध्ये मोठी मागणी असली तरी कसोटी क्रिकेटसाठी त्यांच्याकडे दमदार खेळाडूच नाहीत. स्वतः मुख्य प्रशिक्षक डेरेन सॅमी यांनीच कबूल केले की, ‘वेस्ट इंडीजमधील कसोटी क्रिकेटचा ऱहास हा कर्परोगासारखा आहे, ज्यावर सध्या उपचार अशक्य वाटतात.’

Comments are closed.