टीम इंडियाची पहिल्या स्थानावरुन घसरण, दक्षिण आफ्रिकेसह हे संघ टॉप-4 मध्ये, जाणून घ्या पॉईंट टेब


आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर: आयसीसी महिला वनडे विश्वचषकातील दहावा सामना गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 251 धावा केल्या. या डावात ऋचा घोषच्या 94 धावांच्या शानदार खेळीचे मोठे योगदान होते, कारण संघाने एकवेळ 102 धावांवर सहा गडी गमावले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 49व्या षटकात विजय मिळवला. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलच्या पहिल्या चारमध्ये एन्ट्री मारली. दरम्यान, भारताला स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला आणि त्याने आपले अव्वल स्थान गमावले. पॉइंट्स टेबलमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेसोबत तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताच्या प्रतिका रावल (37) आणि स्मृती मंधाना (23) यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर हरलीन देओल (13), हरमनप्रीत कौर (9), जेमिमा रॉड्रिग्ज (0) स्वस्तात बाद झाल्या. दीप्ती शर्मा (4) आणि अमनजोत कौर (13) यांनाही काही खास करता आले नाही. संघाने 102 धावांवर सहा गडी गमावले आणि एका क्षणी वाटत होते की भारत 150 धावांपर्यंतही पोहोचणार नाही.

ऋचा घोषची जबरदस्त खेळी

ऋचा घोषने 77 चेंडूंमध्ये 94 धावांची जबरदस्त खेळी केली. तिच्या डावात 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. स्नेह राणानेही 24 चेंडूंवर 33 धावा करून चांगली साथ दिली. ऋचाच्या या खेळीमुळे भारताने 251 धावांचा स्कोर उभारला. दक्षिण आफ्रिकेसाठी क्लो ट्रायॉनने सर्वाधिक तीन बळी घेतले.

नादिन डी क्लार्क ठरली ‘सामनावीर’

क्रांती गौडने दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट घेतली, तिने तझमिन ब्रिट्सला बाद केले आणि तिच्याच गोलंदाजीवर एक शानदार झेल घेतला. त्यानंतर सून लुस (5) स्वस्तात बाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केली, मॅरिझाने कॅप (20), अँनी बॉश (1) आणि सिनालो जाफ्ता (14) सर्व स्वस्तात बाद झाले. पण, सलामीवीर लॉरा वोल्वार्डने 111 चेंडूत 70 धावा काढल्या. त्यानंतर क्लो ट्रायॉन (49) आणि नादिन डी क्लार्क (84) यांनी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. डी क्लार्कने 54 चेंडूत 84 धावा केल्या, पाच षटकार आणि आठ चौकार मारले. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तसेच तिने दोन विकेट घेतल्या.

विजय मिळवूनही भारताच्या मागे दक्षिण आफ्रिका

या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत थोडी प्रगती केली, परंतु भारताला मागे टाकण्यात अपयश आले. सध्याच्या गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, इंग्लंड दुसऱ्या, भारत तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यापैकी 2 जिंकले आणि 1 हरला आहे. भारताचे एकूण 4 गुण असून त्याचा नेट रनरेट +0.959 आहे. दक्षिण आफ्रिकेनेही 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, पण तिचा रनरेट -0.888 आहे. त्यामुळे गुण समान असूनही दक्षिण आफ्रिका भारताच्या पुढे जाऊ शकली नाही.

आणखी वाचा

Comments are closed.