पुणे बाजार समिती सभापती जगताप यांची जहागिरी नाही, संचालक प्रशांत काळभोर यांचा मनमानी कारभारावरून सभापतींना टोला

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप हे मोजक्याच संचालकांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने कारभार हाकत आहेत. बाजार समिती ही प्रकाश जगताप यांची जहागिरी नाही, असा टोला संचालक प्रशांत काळभोर यांनी सभापती यांना लगावला. बाजार समितीतील नियमबाह्य पद्धतीने केलेल्या गैरकारभाराचा लवकरच पर्दाफाश करणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पणनमंत्र्यांना भ्रष्टाचाराची माहिती देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख ठरवली. तसेच संचालकांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आल्यानंतर वार्षिक अहवाल दिला ही सरळ सरळ सभापतींची मनमानी आहे. अहवालावर फोटो छापाई करताना तालुक्यातील व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील, बापूसाहेब पठारे यांचे फोटो छापले नाहीत. पूरग्रस्त शेतकर्‍यांना ५० लाखांची मदत करणयाची सूचना संचालक रोहिदास उंद्रे यांनी केली होती. शेतकर्‍यांना भरघोस मदत देण्याऐवजी फक्त २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय परस्पर घेतला. कार्यक्षेत्रातील आमदार, जिल्हा बँक संचालाक, पॅनल प्रमुख, संचालक मंडळातील सहकारी संचालकांना सोबत घेऊन चेक देणे आवश्यक असताना स्वतःला श्रेय घेण्यासाठी व पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर स्वतःची पाठ थोपटण्यासाठी परस्पर स्वतः मदतीचा चेक देऊन आले. सभापती झाल्यावर दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन सत्कार करून घेतले. पण मंत्रालयात असताना देखील मदतीचा चेक देताना त्यांना साधी कल्पनाही दिली नाही. तालुक्यामध्ये स्वतःची टिमकी मिरवण्यासाठी जाणीवपूर्वक मंत्र्यांना टाळले. त्यामुळे काम असेल तेव्हा आमदारांचे उंबरे झिझवतात आणि काम झाल्यानंतर ओळख देणे सुद्धा दुरापास्त होते. हे म्हणजे अंधारात कामे करून घ्यायचे आणि उजेडात स्वतःचा टेंभा मिरवायचा हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे. यशवंत कारखान्याचा जमीन खरेदीचा सामंजस्य करार संचालक मंडळ सभेपुढे न घेता मोजक्या संचालकांना हाताशी धरून केला. सभापतींनी मनमानी कारभार थांबवला पाहिजे. अन्यथा या नियमबाह्य पद्धतीने केलेल्या गैरकारभाराचा लवकरच पर्दाफाश करण्याचा इशारा बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

मी गेल्या तीन महिन्यांपासून सभापती आहे. बाजार समितीमध्ये प्रत्येक महिन्याला मासिक मिटिंग होत असते. या मिटिंगसाठी प्रशांत काळभोर हे उपस्थित असतात. मिटिंगमध्ये घेतले जाणारे सर्व निर्णय हे बहुमताने मंजूर केले जातात. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. – प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे.

Comments are closed.