मायावतीचे लक्ष्य अखिलेश योगींचे कौतुक करते

मायावतींकडून नव्या समीकरणाचे संकेत

वृत्तसंस्था/लखनौ

बसप प्रमुख आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती पुन्हा स्वत:च्या आक्रमक शैलीत दिसून आल्या. लखनौच्या काशीराम स्मारक पार्कमध्ये आयोजित सभेत मायावती यांनी एकीकडे स्वत:चे कार्यकर्ते आणि समर्थकांशी थेट संवाद साधला, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. तर काशीराम स्मारक पार्कच्या देखभालीसाठी त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे आभार मानले आहेत.

समाजवादी पक्ष सत्तेवरून बाहेर पडल्यावरच पीडीएची आठवण काढतो अशी टीका मायावती यांनी केली.समाजवादी पक्षाने अलिकडेच काशीराम यांच्या पुण्यतिथीला कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. परंतु सत्ता नसेल तरच समाजवादी पक्षाला काशीराम आणि पीडीएचे स्मरण होते. समाजवादी पक्षाचे सरकार असताना उत्तरप्रदेशात काशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली नव्हती. तसेच माझ्या सरकारने कासगंज जिल्ह्याला काशीराम नगर हे नाव दिले होते. हे नाव अखिलेश यादव यांच्या सरकारने बदलले होते अशी आठवण मायावती यांनी सभेत करून दिली.

काशीराम स्मारक पार्कची चांगल्याप्रकारे देखभाल केल्याप्रकरणी मी योगी सरकारची आभारी आहे. योगी सरकारने लोकांनी खरेदी केलेल्या तिकिटांचा पैसा हडपला नाही तसेच अखिलेश यादव सरकारप्रमाणे भ्रष्टाचार केला नाही. तर बसपच्या आग्रहानुसार योगी सरकारने या निधीतून पार्कमध्ये दुरुस्तीकार्ये करविली आहेत. तिकिटांचा पैसा अन्य कुठल्याही कामासाठी नव्हे तर केवळ पार्कच्या देखभालीत खर्च होईल असे आश्वासन योगी सरकारने दिले होते असे मायावती यांनी म्हटले आहे.

Comments are closed.