मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्राण जर यांना महत्त्वाचे नसतील तर महाराष्ट्रात निजामाचे बाप राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? संजय राऊत यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात पंतप्रधान पीएम केअर फंडातून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र पंतप्रधानांनी कोणतंही पॅकेज न जाहीर करता ते माघारी गेले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारला फटकारले आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या हातात तीन हजार देखील पडत नसल्याचे म्हटले आहे. तसेच जर पीएम केअर फंडातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर त्याचा काय फायदा, असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
”मुंबई दौऱ्यात पंतप्रधान महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती. पण मोदींवर हे ओझ पडू नये. त्यामुळे फडणवीसांनी आधीच पॅकेज जाहीर केले. त्या पॅकजेची चिरफाड केली तर शेतकऱ्यांच्या हातात तीन हजार देखील पडत नाही. मोदींनी शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून मदत करायला हवी होती. जर शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर मग पीएम केअर फंड कशा करता आहे? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. त्याचा उपयोग जर पूरग्रस्त शेतकऱ्यांना होत नसेल त्याचा काय फायदा आहे? हा पैसा कुठून गोळा केला, त्याचा उपयोग काय याची माहिती जनतेला मिळायला हवी. गेल्या चार महिन्यात मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे असं समजायचं का? त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? तुम्ही थातूर मातूर घोषणा करता आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळाही पडत नाही ही गंभीर गोष्ट आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
”शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे. पुढच्या दोन पिढ्या तरी तिथे शेती होऊ शकणार नाही. त्यामुळे शेकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. अंबादास दानवे. चंद्रकांत खैरे यांनी जय्यत तयारी केली आहे. हजारो शेतकरी तिथे येतील व मोर्चा संपल्यानंतर उद्धव ठाकरे तिथल्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन करतील”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Comments are closed.