विजय हजारे ट्रॉफीला नवसंजीवनी! रोहित-विराटच्या पुनरागमनाने देशांतर्गत क्रिकेट रंगणार

हिंदुस्थानच्या देशांतर्गत क्रिकेटला नवा श्वास देणारी बातमी समोर आली आहे. हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत या दोन दिग्गजांनी देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. आगरकर यांनी स्पष्ट केले होते की, प्रत्येक केंद्रीय करारबद्ध खेळाडू जो तंदुरुस्त आणि उपलब्ध आहे त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दिशेने पाहता खेळाडूंनी घरच्या स्पर्धांत सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. देशांतर्गत क्रिकेट हाच राष्ट्रीय संघाचा पाया आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांच्या या भूमिकेनंतर विराट आणि रोहित या दोघांनीही आपला अनुभव आणि उपस्थिती देशांतर्गत क्रिकेटकडे परत नेण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी आपली उपलब्धता निश्चित केली असून ते किमान तीन ते चार सामने खेळतील अशी अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर (6 डिसेंबर) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यादरम्यान (11 जानेवारी) सुमारे पाच आठवडय़ांचा अवकाश असल्याने या काळात दोघेही आपल्या राज्य संघांसाठी मैदानात उतरतील. रोहित मुंबईचे, तर विराट दिल्लीचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या दोन्ही ताऱ्याच्या पुनरागमनामुळे विजय हजारे ट्रॉफीचा दर्जा आणि आकर्षण दोन्हीही नव्या उंचीवर जाणार आहे. यानिमित्ताने देशभरातील तरुण खेळाडूंना या दोन दिग्गजांसोबत खेळण्याची अमूल्य संधी मिळणार आहे, तर प्रेक्षकांसाठी ही खरी क्रिकेटची पर्वणी ठरणार आहे. खरं सांगायचे तर विजय हजारे ट्रॉफीला आता केवळ ‘स्पर्धा’ नव्हे, तर ‘उत्सवाचा’ चेहरा मिळाला आहे आणि त्या उत्सवाची सर्व सूत्रे रोहित आणि विराट यांच्या हातात आहेत.
Comments are closed.