लोअर परळमध्ये उभारली ‘माणुसकीची भिंत’

‘माणुसकीची भिंत’ यंदा ‘पांघरुण मायेचं’ हा जिव्हाळय़ाचा आणि उबदार उपक्रम घेऊन आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हा उपक्रम म्हणजे माणुसकीची खरी उब देणारा प्रयत्न आहे. समाजाने अशा उपक्रमात सहभागी होत राहणे हीच खरी समाधानाची भावना आहे’, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट आणि आभार फाऊंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम लोअर परळ येथील पेनिन्सुला बिझनेस पार्प गेटजवळ 14 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार आहे. यावेळी शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपक्रमाचे जनक पुंडलिक लोकरे व आभार फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश चव्हाण उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांकडून स्वच्छ पांघरुण, स्वेटर, शाली, ब्लँकेट, कानटोप्या अशा वस्तूंचे मोठय़ा प्रमाणावर संकलन होत आहे. या वर्षी जमा झालेल्या वस्त्रांची उब महाराष्ट्रातील विविध जिह्यांतील लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरजू बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. दान केलेली वस्त्र स्वच्छ, वापरण्यायोग्य आणि न फाटलेली असावीत, अशी विनंती आयोजकांकडून दानशूरांना करण्यात आली आहे.
Comments are closed.