शेतकरी आक्रोश करत असताना मंत्र्यांना प्रसिद्धीचं वेड लागलंय, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मराठवाड्यात अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला शेतकरी आक्रोश करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या मंत्र्यांना मात्र स्वतःच्या प्रसिद्धीचे वेड लागले आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मंत्र्यांच्या जाहिरातबाजीवर घणाघात केला. कल्याण, अंबरनाथ, जोगेश्वरीतील भाजप, रिपाइं, अजित पवार गट, शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
मुंबई भेटीवर आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना त्या जाहिरातबाजीवर टीका केली. संपूर्ण परिसर होर्डिंग्ज, बॅनर्सनी बरबटून टाकला आहे. आले होते ब्रिटनचे पंतप्रधान आणि स्वागत कोण करतेय तर आपले उपमुख्यमंत्री. अरे तिथपर्यंत पोहोचले तरी होते का, बोलले तरी का. ते बॅनर पाहिले तर असे वाटते की, ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच मिंधे सेनेत प्रवेश केलाय की काय, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. चांगले काम केले तर लोक स्वतःहून दाद देतात आणि तुमचे कौतुक करतात, पण महायुतीच्या मंत्र्यांकडून जाहिरातबाजी करून सगळी धूळफेक केली जात आहे, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभा प्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, जिल्हा संघटक रेखा पंटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सध्याच्या संघर्षाच्या काळात खरी शिवसेना काय आहे हे तुमच्यासारखे कार्यकर्ते दाखवून देत आहेत, तुमचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
Comments are closed.