ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, सत्ताधाऱ्यांविरोधात सोमवारी शिवसेना मनसेचा मोर्चा

रोजच्या वाहतूककोंडीत तासन्तास घुसमटणारा जीव, बिल्डरांसाठी पळवले जाणारे पाणी, बेकायदा बांधकामांचे टॉवर, क्लस्टरचा फज्जा, महापालिकेतील अधिकाऱ्यांचा बेबंद भ्रष्टाचार आणि वाढलेली गुन्हेगारी यामुळे ठाणेकर अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. मात्र त्यानंतरही राज्यकर्ते ढिम्म असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी शिवसेना आणि मनसेचा भव्य संयुक्त मोर्चा ठाण्यात निघणार आहे. सायंकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन येथून सुरू होणाऱ्या या मोर्चात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत.

ठाण्यात महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेबंदशाही सुरू असून लाचखोरीचे पेव फुटले आहे. टक्केवारीच्या राजकारणात सर्वसामान्य ठाणेकरांची मात्र फरफट होत आहे. त्यांच्यावरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना आणि मनसेने एकजुटीची वज्रमूठ वळली आहे. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज ठाण्यात टिप टॉप प्लाझा येथे दोन्ही पक्षांची एकत्र पत्रकार परिषद झाली.

यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी निघणाऱ्या मोर्चाची माहिती देतानाच ठाण्यातील गलिच्छ राजकारणाला कंटाळलेल्या प्रत्येक ठाणेकराने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा खोपकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

पालिकेचे नाव बदला, शिंदे शाखा करा – विचारे

गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत ठाण्याची काय दुर्दशा झाली हे ठाणेकरांनी पाहिले आहे. 2017 नंतर पालिका निवडणुका झाल्याच नाहीत. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक नाही. अधिकाऱ्यांचा बेबंद कारभार सुरू आहे, असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला. सध्या ठाणे पालिकेकडे गटाराचे झाकण बदलण्यासाठी पैसे नाहीत. शासनाचा निधी आणावा लागतो, पण या निधीचा लेखाजोखा कुठेच नाही. महापालिकेची स्थापना होऊन 43 वर्षे झाली. त्याचदिवशी 25 लाखांची लाच घेताना अधिकारी पकडला गेला. हे गिफ्ट ठाणेकरांना त्याचदिवशी मिळाले काय? त्यामुळे ठाणे पालिकेचे नाव बदला आणि मिंधे शाखा ठेवा, असा टोला विचारे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार ठाणे जिह्यात सुरू असून राजरोसपणे ठाणे लुटण्याचे काम सुरू आहे. तसेच दुबार आणि बोगस नावांचे पुरावे आम्ही दिले. त्यातील एकही नाव वगळलेले नाही. आता प्रभागातील याद्यांमध्ये फिरवाफिरवी झाली तर कायदा गेला चुलीत, एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा इशाराच विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बाळासाहेबांची ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार – जाधव

ठाण्यात सत्ताधाऱ्यांची दहशत प्रचंड वाढलेली आहे. आमच्याकडे प्रवेश करा नाहीतर त्रास देऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांनी ठाण्याला बरबाद करून टाकले आहे, कामे करायची नाहीत, बिले काढायची असे यांचे धंदे सुरू आहेत. सत्ता आल्यानंतर सर्व कामांची चौकशी आम्ही करू, असा इशारा यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला. यापुढे ठाण्यात दहशत चालणार नाही. आता यापुढे पैशांना नाही तर कामांना मते मिळतील. असे सांगतानाच येत्या सोमवारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार आहे, असे जाधव यांनी ठणकावून सांगितले.

Comments are closed.