नागपुरात ओबीसींचा भव्य मोर्चा; मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर रद्द करण्याची मागणी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर रद्द करा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाने आज नागपूरमध्ये धडक मोर्चा काढला. आरक्षण आमच्या हक्काचं! ओबीसींवर होणारा अन्याय दूर करा, अशा घोषणा देत विदर्भासह राज्यभरातील हजारो ओबीसी बांधवांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे ओबीसी नेत्यांनी महायुती सरकारला दिला.

यशवंत स्टेडियमपासून सुरू झालेल्या या मोर्चाचे संविधान चौकात सभेत रूपांतर झाले. कॉँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुनील केदार, राजेंद्र मुळक, महादेव जानकर, किशोर कन्हेरे आदी नेते या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींच्या आजच्या ऐतिहासिक मोर्चात 371 जाती आहेत आणि दुसरीकडे केवळ एक मराठा जात आहे. जे 56 टक्के त्यांना 27 आरक्षण टक्के आणि 15 टक्के लोकांना 48 टक्के आरक्षण ही चाणक्यनीती आहे. राज्यातील 15 टक्क्यांचे सरकार हे तुमच्यात भांडण लावण्याचे काम करत आहे. 2 सप्टेंबरचा जीआर वाचल्यावर हे सरकार एकटय़ा मनोज जरांगेंच्या भरवशावर निवडून आले काय असा प्रश्न पडतो, असे वडेट्टीवार म्हणाले.

आमदारकी गेली खड्डय़ात

आमदारकी गेली खड्डय़ात. हा वड्डेटीवार कसलीही पर्वा करणार नाही. माझा डीएनए ओबीसी आहे, तुमचा ओबीसी असेल तर ओबीसींच्या गळय़ावर सुरी का फिरवत आहात, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. आज संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे. सरकारने याच्यापुढे नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले तरी ते ओबीसीमध्ये पात्र होणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसींच्या हातात घंटा देणार. मग तुम्हाला घंटा वाजवायचे काम राहील, असे वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई-पुणे जाम करू

राजकारणापलीकडे जाऊन जो कोणी आपला घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा. त्यांनी केवळ मुंबईत मोर्चा काढला. आम्ही मुंबई-पुण्यासह ठाणेही जाम करू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला दिला आहे. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणू नये. सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र मार्ग शोधावा, पण ओबीसीमधील मराठय़ांची घुसखोरी थांबवा. सरकार थांबवत नसेल तर आम्ही सरकारला थांबवू, असा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळी दिला.

Comments are closed.