आता अफगाणिस्तानशी मुत्सद्दी संबंध
काबूलच्या कार्यालयाचा राजदूतावास केला जाणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारशी राजैनिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंतर्गत या देशाची राजधानी असणाऱ्या काबूल येथील भारतीय कार्यालयाचे राजदूतावासात रुपांतर केले जाणार आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने या निर्णयांची घोषणा केली आहे कोणत्याही भारत विरोधी कारवाईला आम्ही आमची भूमी किंवा संसाधने देणार नाही, असे आश्वासन मुत्तकी यांनीही भारताला दिले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये दृढ द्विपक्षीय संबंध प्रस्थापित होणार असून हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे.
भारताच्या दौऱ्यावर असणारे अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी येथे चर्चा केली आहे. या चर्चेतच भारताने अफगाणिस्तानसंबंधी घेतलेल्या निर्णयाची माहिती मुत्तकी यांना देण्यात आली. भारताने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी मुत्तकी यांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून भारताने हे महत्वाचे निर्णय घेतले आहेत, असे स्पष्ट केले गेले.
भारत खाराखुरा मित्रदेश
भारत हा अफगाणिस्तानचा खराखुरा मित्रदेश आहे. अफगाणिस्तानच्या संकटाच्या काळात भारतानेच आम्हाला पाठिंबा दिला आहे, अशी भलावण मुत्तकी यांनी केली. तसेच कोणत्याही भारतविरोधी कारस्थानांना आम्ही आमच्या भूमीवर थारा देणार नाही, किंवा संसाधनेही देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी चर्चा करत असताना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता भारताचे या देशाशी पूर्वीसारखे जवळचे संबंध प्रस्थापित होणार आहेत, हे स्पष्ट होत आहे.
10 महिन्यांनंतर राजनैतिक संबंध
10 महिन्यांच्या कालावधीनंतर भारताने अफगाणिस्तानशी पुन्हा परिपूर्ण राजनैनिक संबंध जोडले आहेत. सात वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर तेथे तालिबानची राजवट आलेली आहे. तथापि, अद्यापपावेतो रशियाचा अपवाद वगळता या राजवटीला कोणत्याही देशाने अधिकृत राजनैतिक मान्यता दिलेली नाही. भारताने येथे केवळ आपले एक कार्यालय प्रस्थापित केले होते. भारताच्या दूतावासाला संपूर्ण सुरक्षा दिली जाईल, हे आश्वासन तालिबान सरकारने दिल्यानंतर भारताने येथे आपले कार्यालय 10 महिन्यांपूर्वी स्थापन केले होते. आता याच कार्यालयाचे रुपांतर संपूर्ण राजदूतावासात केले जाणार असून राजदूतांची नियुक्तीही केली जाणार आहे.
चार वर्षांपूर्वीची स्थिती…
अफगाणिस्तानात त्यावेळी होत असलेल्या हिंसाचाराच्या विचार करुन भारताने काबूल येथील दूतावासाचा दर्जा कमी केला होता. तेथील भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्याही बरीच कमी केली होती. भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांना भारतात परत आणण्यासाठी विमानेही पाठविण्यात आली होती. तेथील भारतीय दूतावासाचे कार्यालय जवळपास बंद करण्यात आले होते. तथापि, आता भारत आणि तालिबान राजवट यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे भारताने हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी हे महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
पाकिस्तानला धक्का
अफगाणिस्तानात भारताचा अधिकृत राजदूतावास स्थापन करण्याचा निर्णय पाकिस्तानला मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत होते. या निर्णयामुळे भारत आणि अफगाणिस्तान हे एकमेकांच्या अधिक नजीक येणार आहेत. पाकिस्तानला हे नको आहे. तालिबान राजवटीला आपल्या कह्यात ठेवण्याचे पाकिस्तानचे धोरण आहे. त्याला छेद गेल्याने पाकिस्तानची कोंडी होईल, असे तज्ञांचे मत आहे.
भारताचा महत्वाचा निर्णय
- काबूल येथे अधिकृत दूतावास स्थापण्याच्या निर्णयामुळे संबंध भक्कम
- भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची कोंडी होणार : तज्ञांचे मत
- भारतविरोधी कारवायांना थारा नसल्याचे अफगाणिस्तानचे आश्वासन
- भविष्यकाळात अफगाणिस्तानशी आर्थिक संबंधही वाढविले जाणे शक्य
Comments are closed.