Latur News – अतिवृष्टीचा फटका; पालेभाज्यांचे दर वाढले

मराठवाड्यात सलग पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातील पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात अशा हिरव्या भाज्यांचे दर अचानक वाढले आहेत. १० ते १५ रुपयाला जुडी मिळणारी पालेभाजी आता ३० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण आला असून बाजारातही हिरव्या भाज्यांची कमतरता जाणवू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात झालेल्या पावसाने शेतीतील भाजीपाला बुडाल्याने पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे: शेतकऱ्यांचे कोथिंबीर, पालक, मेथी यासारख्या पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे झाडांवर बुरशी, कुज, कीड यांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.
दररोज येणाऱ्या पालेभाज्यांच्या गाड्या आता निम्म्याने कमी झाल्या आहेत. ग्राहक कमी खरेदी करत आहेत, काही लोकांचं दररोजच्या भाज्या घेणंही कमी झाल आहे. पाऊस थांबून आठवडाभर झाला तरी पिकं सावरायला वेळ लागेल, त्यामुळे भाव आणखी काही दिवस स्थिर होणार नाहीत.
काही भागात पाणी ओसरल्यानंतरही जमिनीतील आर्द्रतेमुळे नवीन पेरणीस उशीर होणार आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी बाजारात पुरवठा कमीच राहणार आहे. दरवाढीमुळे ग्राहकांचा स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे. कुटुंबातील रोजच्या आहारातील पालेभाजीचा वाटा कमी झाला असून लोकांनी पर्याय म्हणून कोबी, टोमॅटो, भोपळा यासार यासारख्या भाज्यांकडे वळायला सुरुवात केली आहे.
Comments are closed.