मोदी सरकारकडून राष्ट्रीय शेठला कल्याणची ४५० एकर जमीनही बहाल, अदानीच्या सिमेंट कंपनीसाठी सर्व नियमही बदलले – हर्षवर्धन सपकाळ

“देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे”, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

कल्याण येथील अदानीच्या सिमेंट कंपनीला स्थानिकांचा विरोध असून त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईचे वितानतळ, धारावी, मदर डेअरी, देवनारची जागा मोदी सरकारने लाडक्या मित्राला दिली, त्यानंतर वाढवण बंदराच्या नावाखाली पालघर देऊन टाकले व आता कल्याणमधील ४५० एकर जमीन राष्ट्रीय शेठच्या सिमेंट कंपनीसाठी दिली. फक्त जमीनच दिली नाही तर या सिमेंट कंपनीसाठी पर्यावरणासह सर्व नियमच बदलून टाकले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ही सिमेंट कंपनी स्थानिकांच्या जीवावर उठलेली असून स्थानिकांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी, दबाव आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवला आहे. या प्रश्नी काँग्रेस पक्ष विधानसभेतही आवाज उठवेल”, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

Comments are closed.