अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला हायकोर्टाचा दिलासा नाही; 100 कोटींचा मानहानीचा खटला फेटाळला

चित्रपट अभिनेता, निर्माता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा नाकारला आहे. नवाजुद्दीनने त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्याविरुद्ध दाखल केलेला 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. भावावर आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती. त्यात त्याने विश्वासघात केला आणि पैशांचा गैरव्यवहार केला. तसेच माझी सोशल मीडियात बदनामी केली, असा दावा नवाजुद्दीनने केला होता.
शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या खात्यांमधील पैशांचा गैरव्यवहार करण्याबरोबर प्रतिष्ठा मलिन केल्याचा आरोप आहे. याच आरोपांवरुन नवाजुद्दीनने मानहानीचा खटला दाखल केला होता. 2008 मध्ये नवाजुद्दीनने शमसुद्दीनला व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते. शमसुद्दीनकडे ऑडिटिंग, आयकर रिटर्न भरणे आणि इतर आर्थिक कामांचे व्यवस्थापन करणे यांसारख्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच शमसुद्दीनकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक पासवर्ड, चेक बुक, ईमेल आयडी आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे देण्यात आली होती, असा दावा नवाजुद्दीनने याचिकेत केला होता.
अभिनयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी नवाजुद्दीनने भावाकडे आर्थिक कामांची जबाबदारी सोपवली होती. याच विश्वासाचा शमसुद्दीनने गैरफायदा उठवला आणि आपली फसवणूक केल्याचा आरोप नवाजुद्दीनने केला होता. इतकेच नव्हे तर शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या विभक्त पत्नीला खोटे खटले दाखल करण्यास प्रवृत्त केले. अंजनाने लग्नापूर्वी स्वतःला अविवाहित मुस्लिम महिला म्हणून खोटे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु ती तेव्हा विवाहित होती. शमसुद्दीन आणि अंजना या दोघांनी मिळून जवळपास 20 कोटी रुपयांचा गैरवापर केला. दोघांनी माझी सोशल मिडीयात प्रचंड बदनामी केली, असा दावा नवाजुद्दीनने केला होता. तथापि, न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नवाजुद्दीनचा दावा मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आणि दावा फेटाळून लावला.
Comments are closed.