आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा, बंजारा समाजाने अडवला अशोक चव्हाण यांचा ताफा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ताफा सारखणीजवळ बंजारा समाजाने अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी आंदोलकांनी बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका स्पष्ट करा, असा जाब विचारला. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आज किनवट तालुक्यात माजी भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा दौरा होता. किनवट तालुक्यातील सारखणी येथील तुळजाभवानी माता मंदिर येथून त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तो अडवला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत बंजारा समाजाने त्यांच्या आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाणांनी आपली भूमिका का स्पष्ट केली नाही, याचा जाब विचारला.

बंजारा समाज सबंध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीमधून आरक्षण मागत आहेत. यासाठी वेगवेगळे मोर्चे सबंध राज्यात व जिल्ह्यात निघत आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री खासदार राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी याबाबत कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही किंवा त्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला नाही. बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत तुम्ही समर्थन का करत नाही, तुमची नेमकी भूमिका काय आहे, असा जाब विचारत प्रचंड घोषणाबाजी केली. एकच मिशन बंजारा आरक्षण, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या आणि त्यांना घेरावही घातला. त्यानंतर अशोक चव्हाणांनी त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. याबाबत वरिष्ठांना बोलू, असे आश्वासन त्यांनी दिले. तरीही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली होती. अचानक चव्हाणांना घेराव घातल्याने पोलीस देखील गोंधळून गेले. त्यांनी जमावाला समजावून चव्हाणांना वाट करुन दिली.

Comments are closed.