IND vs WI: शुबमन गिलमुळे यशस्वी जयस्वाल धावबाद झाला? जाणून घ्या नेमकं काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) थोडक्यात दुप्पट शतक गाठण्यापासून थोडक्यात हुकला. दिवसातील केवळ 8 वा चेंडू टाकला जात असताना तो वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.

पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत त्याने फक्त दोन धावा अधिक केल्या होत्या. जेडन सील्सच्या फुल लेंथ चेंडूवर जयस्वालने पुढे येत शॉट मारला आणि तो मिड-ऑफकडे गेला. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती गेला. नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) धाव घेण्यास नकार दिला, पण तोपर्यंत जयस्वाल धाव घेण्यासाठी बॅट काढून धावत होता. तिथेच अडचण निर्माण झाली.

भारतीय कर्णधाराने धाव घेण्याची इच्छा दाखवली नव्हती. जयस्वाल जेव्हा परत यायला धावला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे तो धावबाद झाला. त्यानंतर बराच वेळ तो मैदानावरच उभा राहिला. परत जाताना तो गिलवर नाराज दिसत होता. मात्र दिवसाचा खेळ संपल्यानंतर जयस्वालने या धावबाद प्रकरणावर मौन सोडले.

दुसऱ्या दिवसाच्या स्टम्प्सनंतर प्रसारणकर्त्यांशी बोलताना जयस्वाल म्हणाला, मी नेहमी शक्य तितकं जास्त वेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. जर मी मैदानावर आहे, तर मला संघासाठी खेळ पुढे नेला पाहिजे आणि शक्य तितकं जास्त वेळ खेळायला हवं. धावबाद झाल्याबद्दल तो म्हणाला,
हा खेळाचा भाग आहे, त्यामुळे काही हरकत नाही.

तिसरं द्विशतक हुकल्याबद्दल तो म्हणाला, मनात नेहमी विचार असतो की मी काय साध्य करू शकतो, माझं उद्दिष्ट काय आहे आणि माझ्या संघाचं लक्ष्य काय आहे. मी फक्त खेळात टिकून राहण्याचा प्रयत्न करतो आणि खात्री करतो की जर मी क्रीजवर असेन तर जास्तीत जास्त वेळ तिथे राहायला हवं.

तो पुढे म्हणाला, मी सेट होण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे थोडी हालचाल झाली. पण जेव्हा मी क्रीजवर होतो, तेव्हा मी विचार करत होतो की अजून एक तास खेळलो तर मला धावा करणं सोपं जाईल. विकेट अजूनही चांगली आहे. आपण खूप चांगली गोलंदाजी करत आहोत. शक्य तितक्या लवकर आपण त्यांना रोखू आणि पुन्हा मोठा टप्पा गाठू.

Comments are closed.