मध्य रेल्वेवर दलालांचा सुळसुळाट

मध्य रेल्वे मार्गावर तिकीट दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. रेल्वेच्या महसुलावर थेट परिणाम करणाऱ्या गैरप्रकारांविरोधात वाहतूक दक्षता विभागाने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दक्षता पथकाने विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यात तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलाली, बनावट ओळखपत्रे आणि बनावट तिकिटांवर प्रवास यांसारखे गैरप्रकार समोर येत आहेत. तिकीट दलालीची साखळी तोडण्यासाठी कारवाई केली जात असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेकायदेशीर तिकिटे खरेदी करण्याच्या पद्धतींवर मध्य रेल्वेच्या वाहतूक दक्षता विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे. जानेवारी ते मे या कालावधीत विविध ठिकाणी आठ प्रतिबंधात्मक तपासणी केल्या. फेब्रुवारीत अंबरनाथमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बेकायदेशीर ई-तिकीट विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. यावेळी 13 आयआरसीटीसी आयडी जप्त करण्यात आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. 18 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये चार तिकीट दलालांना अटक करण्यात आली. मार्चमध्ये पुण्यातील डेक्कन जिमखाना पीआरएस येथे तीन तिकीट दलालांना 10 हजार 520 रुपयांच्या तीन जेसीआर तिकिटांसह पकडण्यात आले.
Comments are closed.