Ind vs WI – ‘टीम इंडिया’ची दिल्ली कसोटीवर पकड! कर्णधार शुभमन गिलचे नाबाद शतक, हिंदुस्थानचा डाव 5 बाद 518 धावांवर घोषित

यजमान ‘टीम इंडिया’ने दिल्ली कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱयाच दिवशी मजबूत पकड घेतली. हिंदुस्थानने पहिला डाव 5 बाद 518 धावांवर घोषित केल्यानंतर पाहुण्या वेस्ट इंडीजची उर्वरित 43 षटकांत 4 बाद 140 धावा अशी दुर्दशा झाली असून ते अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहेत. ‘टीम इंडिया’चा कर्णधार शुभमन गिलचे नाबाद शतक (129 धावा) आणि रवींद्र जाडेजाने 3 बळी टिपत विंडीजची घेतलेली फिरकी ही दुसऱया दिवसाच्या खेळाची वैशिष्टय़े ठरली.
धावबाद झाल्याने जयस्वालचे द्विशतक हुकले
हिंदुस्थानने पहिल्या दिवसाच्या 4 बाद 318 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र शुक्रवारी 173 धावांवर नाबाद परतलेला यशस्वी जयस्वाल दिवसाच्या दुसऱयाच षटकात गैरसमजुतीतून धावबाद झाला. 175 धावांची खेळी करण्याचे या सलामीवीराचे हुकलेले द्विशतक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने कारकीर्दीतील दहावे कसोटी शतक झळकावले.
जाडेजाने घेतली विंडीजची फिरकी
हिंदुस्थानने डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार गिलने रवींद्र जाडेजाला सातव्याच षटकात मोर्चावर आणले. त्याने पहिल्याच षटकात जॉन कॅम्पबेलला (10) सुदर्शनकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. पाठोपाठ चंद्रपॉल (34) यालाही राहुलकरवी झेलबाद करून विंडीजचा दुसरा हादरा दिला. कुलदीप यादवने एलेक एथनाझ (41) जाडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर जाडेजाने कर्णधार रोस्टन चेजला शून्यावरच झेलबाद केल्याने. विंडीजचा डाव 32.2 षटकांत 4 बाद 107 असा संकटात सापडला.
गिलने रोहितला टाकले मागे
गिल आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानकडून सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरलाय. त्याने आतापर्यंत 10 शतके झळकावली असून रोहित शर्माला (9 शतके) मागे टाकले.
कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
गिलने 2025 मध्ये कर्णधार म्हणून पाचवे टेस्ट शतक झळकावले. एका कॅलेंडर वर्षात पाच शतके करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा हिंदुस्थानी कर्णधार ठरला आहे.
Comments are closed.