भ्रमंती – अनवट देशाची आनंददायी सफर
>> अशोका बेंडखळे, [email protected]
कझाकस्तान या काहीशा दुर्लक्षित देशाची ही प्रवास? निसर्ग पर्यटनासोबतच देशाची विज्ञान शास्त्र जाणून घेण्याचा हा अनुभव खरोखरच आनंददायी ठरला?
आजकाल नेहमीपेक्षा वेगळे म्हणजे व्हिएतनाम, साऊथ कोरिया, कझाकस्तान या अनवट देशात आपले पर्यटक जाऊ लागले आहेत. कझाकस्तान या देशात जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. त्यामुळे इथे जायचं आम्ही नक्की केलं. या प्रवासातील अल्माटी हे आमचे पहिले ठिकाण.
पहिल्याच दिवशी अरासन वॉटरफॉल हा उंच डोंगराच्या कपारीमधून वाहत येणारा हा निसर्गनिर्मित धबधबा पाहताना प्रवासाचा थकवा चटकन गेला. उंच पर्वतावरील बर्फाच्या पाण्यांनी हा धबधबा तयार झाला होता. निसर्गाच्या मस्त दर्शनानंतर पुकोलसाई लेक, शारिन कॅन्यन आणि आयसिक लेक ही तीन ठिकाणे आमच्या यादीत होती. कोलसाई सरोवर तीन टप्प्यात विखुरलेले असून अल्माटी शहरापासून 300 कि.मी. अंतरावर आहे. सरोवराला पोचेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या पर्वत-रांगा पाहताना मन प्रसन्न होते. या रस्त्याला जराही रहदारी नाही आणि आजूबाजूला पसरलेली प्रचंड पठारे आणि पर्वतरांगा याचीच साथ असते. इथेच कोलसाई सरोवराचा पहिला विस्तीर्ण टप्पा येतो. समोरचा नितांत सुंदर देखावा पाहून मन सुखावून जाते. सरोवरामधील नितळ निळे पाणी, बाजूला अल्पायीन वृक्षांची हिरवीगार झाडी आणि दूरपर्यंत बर्फाच्छादित पर्वत रांगा कॅमेऱ्यात कैद करताना एक देखणे चित्र अवतरल्याचा भास होतो. कोलसाई सरोवरापर्यंत पोचण्यापूर्वी मून कॅन्यन म्हणजे नदी असलेली एक खिंड पाहता आली. पर्वतराजींमध्ये एका नदीचा स्वच्छ प्रवास दर्शवणारे ते दृश्य खूप लोभसवाणे होते.
दुसऱ्या दिवशी पाहायचे होते ते शारिन कॅन्यन म्हणजे, थोडक्यात विखुरलेल्या खडकांमधले सौदर्य. कुणाला वाटेल खडकात सौंदर्य ते काय असणार? मात्र कल्पनेहून पूर्ण वेगळे असे दृश्य इथं पाहायला मिळते. हा जगातला दुसऱ्या नंबरचा कॅन्यन आहे, तर पहिल्या नंबरवर आहे नॉर्थ अमेरिकेतील ग्रँड कॅन्यन जो 200 कि.मी. परिसरात विखुरलेला आहे. 154 कि.मी. लांब अशा परिसरात पसरलेल्या या कॅन्यनमध्ये लाल आणि नारिंगी रंगाचे वेगवेगळ्या आकारांचे अद्भुत खडक पाहताना आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहात नाही. परत येताना ब्लॅक कॅन्यनचा आनंद घेता आला. इथे काळ्या डोंगराच्या दरीत फेसाळती नदी वाहत होती.
अल्माटी शहरापासून 70 कि.मी. अंतरावर पर्वतांच्या खिंडीमध्ये वसलेले निसर्गनिर्मित असे आयसिक सरोवर पाहिले. त्याचा इतिहास असा- आठ हजार वर्षांपूर्वी डोंगराचे खच्चीकरण झाले त्यातून आयसिक नदीचा प्रवाह बदलला आणि हे सरोवर (लेक) बनले. साठ वर्षांपूर्वी म्हणजे 1963 मध्ये हे नैसर्गिक सरोवर चिखलाच्या झंझावातात नष्ट झाले. त्यानंतर अनेक जणांच्या मेहनतीने छोटय़ा प्रमाणात ते उभे केले गेले. सरोवराच्या आताच्या आकारावरून पूर्वीचे सरोवर किती भव्य असेल याची कल्पना करता येते. सरोवराजवळ राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तुसंग्रहालय पाहता आले. पुरातत्व खात्यातर्फे राख्त आणि ओपॅक प्रांतात केलेल्या संशोधनात प्राचीन कालखंडातील सापडलेली जुनी नाणी, भांडी, वरवंटे, चाकू, गालिचे, काही कलात्मक वस्तु, लोकर विणण्याचे साधन अशा अनेक पुरातनकालीन वस्तू सुबकपणे मांडल्या आहेत.
शिम्बुलक म्हणजे माऊंटेन रिसॉर्टला केबल कारने भेट देणे आणि कॉक टु बी म्हणजे अॅम्युझमेंट पार्क हाही सफारीमधला एक आनंदाचा भाग. माऊंटेन रिसॉर्टमध्ये तीन भागांत केबल कारने जाण्याचा आणि तेथील थंडगार हवेचा तसेच आजूबाजूचे पर्वत, हिरवीगार झाडी पाहणे हा एक वेगळा अनुभव घेता येतो. थंडीमध्ये इथे बर्फ साचत असल्यामुळे बर्फात स्कीईंगची मजा लुटता येते आणि उन्हाळ्यामध्ये छान अशा हवेची.
अल्माटी शहराची एका दिवसाची सहल प्रेसिडेंट पार्क, जुने चर्च, गार्डसमन पार्क मस्जिद अशा वास्तूना भेट देऊन पूर्ण होते. इथे एका आगळ्या वस्तुसंग्रहालयाने आमचे लक्ष वेधून घेतले. ते होते संगीतवाद्यांचे अनोखे संग्रहालय. शंभराहून अधिक वर्षांची (1908) ही देखणी वास्तू आजही दिमाखात उभी आहे आणि आत असलेल्या एक हजारहून अधिक संगीत वाद्यांनी ती परिपूर्ण आहे. ही सगळी वाद्ये 17 व्या शतकापासूनची आहेत आणि त्यात पारंपरिक कझाक वाद्ये तसेच इतर देशांतील म्हणजे भारत पाकिस्तानमधील लोक संगीतात वाजवली जाणारी वाद्ये सुंदररीत्या ठेवली आहेत. इथे पारंपरिक कझाक संगीत ऐकण्याचीही सोय आहे. इथले सेंट्रल स्टेट म्युझियमसुध्दा थोडे पाहता आले. हे संग्रहालय सेंट्रल आशियामधील एक मोठे संग्रहायल मानले जाते. गोल्डन प्रिन्स वॉरियरच्या अंगावर 4 हजार सोन्याचे दागिने आहेत. तो उत्खनन करताना सापडला आणि देशाचा राष्ट्रीय प्रतीक बनला. इथेही कलात्मक जुन्या वस्तु, लोक संगीतामधील वाद्ये पाहता आली.
या सफरीमध्ये तीन चांगली वस्तुसंग्रहालये पाहता आली. अशा संग्रहालयामधून त्या देशाचे कला, संगीत यामधील वेगळेपण अधोरेखित होते आणि पर्यटकांना त्या देशाचे कलात्मक रूपदर्शनही घडते.
Comments are closed.