रोखठोक – बुळे, बावळे आणि खुळे!

सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकणारे आणि प्रबोधनकारांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ पुस्तकावर काहूर माजवणारे पहिल्या धारेचे अंधभक्त आहेत. हे सनातनी विज्ञानाच्या कपाळावर खिळा ठोकीत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत बुवाबाजीला ऊत आला आहे. बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व बनले आहे. या बुवाबाजीविरुद्ध बोलणारे आणि लिहिणारे ‘सनातन धर्म’ नामक विचारसरणीचे लक्ष्य ठरत आहेत. हिंदूंच्या मतावर भाजप निवडणुकांत विजय मिळवत आहे, पण मोदींच्या राजवटीत हिंदूंना उगाच असुरक्षित वाटू लागले. काँग्रेस राज्यात मुसलमानांचे लांगूलचालन सुरू होते. त्यामुळे ‘हिंदू खतरे में’ होता, पण 11 वर्षांपासून कडवट हिंदूंचे राज्य भारतावर असतानाही हिंदू पुनः पुन्हा खतऱ्यात असल्याची बोंब मारली जात आहे. हिंदू खतऱ्यात असल्याच्या दोन घटना घडल्या. सनातन धर्माचा अपमान झाला म्हणून एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी इकडे मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात हिंदू वेगळ्याच पद्धतीने खतऱ्यात आला. रुग्णालयातील एक अधिकारी राजेंद्र चव्हाण हे निवृत्त झाले. निवृत्तीच्या सोहळ्यानंतर चव्हाण यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे पुस्तक भेटीदाखल वाटले. प्रबोधनकारांच्या या क्रांतिकारी पुस्तकामुळे हिंदू धर्माचा अपमान झाला म्हणून एक परिचारिकेने प्रबोधनकारांचे हे पुस्तक चव्हाणांच्या तोंडावर फेकून निषेध नोंदवला. सरन्यायाधीश भूषण गवई आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे हिंदू खतऱ्यात आला असे बोलणे हे माथेफिरूपणाचे लक्षण मानावे लागेल.

हासुद्धा हल्लाच!

भूषण गवईंवर हल्ला करू पाहणारे आणि प्रबोधनकारांच्या पुस्तकांना नाकारणारे एकाच प्रतीचे पहिल्या धारेचे अंधभक्त आहेत. काय तर म्हणे, सनातन्यांचे हिंदुत्व धोक्यात आले. पहलगाम येथे पाक दहशतवाद्यांनी 26 महिलांचे कुंकू पुसले. सनातन्यांच्या मते धर्म विचारून गोळ्या घातल्या. खरे तर या घटनेमुळे हिंदू धोक्यात आले. विष्णूचा तेरावा अवतार कुंकवाचे रक्षण करू शकला नाही. त्यासाठी कोणावर बूट फेकून मारावा याचे चिंतन या सनातन्यांनी स्वतःच करायला हवे. दिल्लीतील स्वामी चैतन्यानंदला आता अटक झाली आहे. आपल्या आश्रमात त्याने अनेक महिलांचे यौन शोषण आणि बलात्कार केले व या सर्व पीडित तरुणींना न्याय देण्यास पोलिसांनी आधी नकार दिला, पण पापाचा घडा भरला. हा स्वामी चैतन्यानंद सरस्वती भारतीय जनता पक्षाचा लाडका प्रचारक होता व स्वामीजी सनातन धर्मावर प्रवचने झोडत होता. या स्वामीवर त्याच्या घाणेरड्या कृत्यांचा जाब विचारण्यासाठी चप्पल फेकावी असे सनातन्यांना का वाटले नाही? आसाराम, रामरहीम, स्वामी नित्यानंद, निर्मल बाबा अशा अनेक सनातनी बाबांचा पर्दाफाश झाला आहे. बागेश्वर बाबा हा भाजपचा प्रचारक असून बाबा आपले लहान भाऊ असल्याचे सांगत पंतप्रधान त्याच्या आश्रमात जातात. विज्ञानाच्या कपाळावर खिळा ठोकण्याचा हा प्रयत्न आहे. जातीयवाद व धर्मांधता वाढवून राजकारण करणारे पंतप्रधान या देशाला लाभले आहेत. ते स्वतःस ईश्वरी अवतार असल्याचे समजतात. प्रबोधनकार ठाकरे यांनी याच ढोंगावर प्रहार केले. अशा जातीयतेवर, बुवाबाजीवर प्रहार करणारे ‘खरा ब्राह्मण’ हे नाटक प्रबोधनकारांनी लिहिले. प्रबोधनकार ब्राह्मणद्वेष्टे आहेत, सनातनविरोधी आहेत म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी या नाटकावर बंदी घालण्याची मागणी न्यायालयात केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळली. सनातन्यांनी प्रबोधनकारांविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यांनी प्रबोधनकारांवर चप्पल फेकली नाही, तर एक मेलेले गाढव प्रबोधनकारांच्या घरासमोर आणून टाकले. प्रबोधनकार घराबाहेर येऊन स्वतःच ते गाढव वाहून नेत होते तेव्हा ‘भाला’कार भोपटकर त्याच रस्त्याने निघाले होते. भोपटकरांनी विचारले, “काय हे केशवराव, हे काय करताय?” त्यावर प्रबोधनकार म्हणाले, “काही नाही, तुमच्या बापाला उचलून नेतोय!” असे हे प्रबोधनकार. त्यांचे विचार आजच्या ढोंगी सनातन्यांना न पेलवणारे आहेत.

पाजी थोतांड

भारतीय जनता पक्ष, संघ परिवाराने सध्या जो धर्म पोसला आहे तो हिंदूंचा खरा धर्मच नव्हे. आजही हा भिक्षुकशाहीचाच धर्म आहे. बुळय़ा, बावळ्या, खुळ्यांना झुलवून एका विशिष्ट वर्गाची तुंबडी भरणारे हे एक पाजी थोतांड असल्याचे परखड मत प्रबोधनकारांनी निर्भीडपणे मांडले. एके ठिकाणी प्रबोधनकार म्हणतात, “शिवाजी म्हणजे मऱ्हाठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव. महाराष्ट्रापुरताच विचार केला तर आजची हिंदूंची तेहतीस कोटी देवांची पलटण पेन्शनीत निघून त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मऱ्हाठ्यांच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे!”

प्रबोधनकारांचे हे विचार विष्णूच्या तेराव्या अवताराचे अस्तित्वच नाकारणारे आहेत. आज राममंदिराच्या नावाने भाजपने जो राजकीय धंदा व ‘चंदा’बाजी केली, त्यावरच प्रबोधनकारांनी 1926 साली ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ लिहून प्रहार केला. सतत देवळे निर्माण होणे व त्यातून स्वार्थ साधणे यावर प्रबोधनकारांनी जहाल भाष्य केले. ‘अशा देऊळबाजीमुळे बहुजनांच्या शिक्षणाचा, प्रबोधनाचा विचार मागे पडतो. माणूस लढण्याचा बाणा विसरतो. दैववादात गुलामीचे तत्त्वज्ञान रुजवले जाते,’ हा प्रबोधनकारांचा विचार. मागच्या दहा वर्षांत आपण याच दैववाद आणि अंधभक्तीचा अनुभव घेत आहोत. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचे राजकारण करीत आहे. हा एक प्रकारे धंदा आहे. या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला. देवळातील संपत्तीवर आज भाजपची नजर गेली. देवळातील संपत्ती आता राजकीय फायद्यासाठी वापरली जाते. या संपत्तीचे रखवालदार म्हणून राजकारणी आपल्याच लोकांची नेमणूक करतात. प्रबोधनकारांनी यावर शतकापूर्वी लिहिले, “हिंदुस्थानातील देवळांत केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्च्या, चोर, ऐदी, हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळात कोटय़वधी लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरीभाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड सुरू आहे. हजारो उमेदवार, ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिनतक्रार चालूच आहे. देशातला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या “ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या भिक्षुक सेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळाएवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही.”

देवस्थानचे उत्पन्न शिक्षणाला

प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्मातील विषमतेवर प्रहार केला. राजर्षी शाहू महाराज व प्रबोधनकारांत एक जिव्हाळ्याचे नाते होते. त्यातून महाराजांनी एक महत्त्वाची गोष्ट केली. देवस्थानचे उत्पन्न शिक्षणाच्या कार्यासाठी खर्च करण्याचा कायदा केला. देवस्थानचे उत्पन्न शिक्षणासाठी वापरताना शाहू महाराजांनी धर्म पाहिला नाही. मुसलमानांच्या बोर्डिंगलाही दर्ग्याचे उत्पन्न जोडून दिले. “सर्व देवस्थाने व पवित्र स्थळे यांचे विश्वस्त सरकार हे आहे. देवस्थाने व तीर्थक्षेत्रे यांची व्यवस्था पाहणे व आर्थिक नियोजन करणे हा सरकारचा अधिकार असल्याचा कायदा 9 जुलै 1917 रोजी शाहू महाराजांनी केला.

प्रबोधनकारांचा धर्म याच मार्गाचा होता. प्रबोधनकारांनी सांगितले, “रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यवधी रुपयांची उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी, प्रगतीसाठी कसकसा उपयोग करायचा, हे ठरविण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पंथ, पक्षभेदाचा निरास होऊन देवळांचा अनेक सतकार्याकडे उपयोग होईल.”

प्रबोधनकारांचा हा विचार सध्याच्या पी.एम. केअर फंडासारखाच आहे. पंतप्रधानांनी सेवाधर्माच्या नावावर पैसे जमा केले, पण ते सत्कार्याकडे वळवले नाहीत एवढाच काय तो फरक! तरीही सनातनी विचारांचे बुळे, बावळे आणि खुळे अंधभक्तीत लीन झाले आहेत.

ट्विटर – @Rautsanjay61

जीमेल- rautsanjay61@gmail.com

Comments are closed.