बंगालच्या उपसागरात भारत आपली शक्ती प्रदर्शित करेल

प्रगत सामरिक शस्त्र प्रणालीच्या चाचण्या होणार : 3,550 किलोमीटरच्या परिघात नो-फ्लाय झोन जाहीर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘ऑपरेशन सिंदूर’पासून भारताने आपली संरक्षण क्षमता आणखी वाढवली आहे. याचाच एक भाग म्हणून, भारताने बंगालच्या उपसागरात क्षेपणास्त्र चाचणीबाबत एक नोटीस टू एअरमेन (नोटॅम) म्हणजेच हवाई जवानांना सूचना जारी केली आहे. हा ‘नोटॅम’ 15 ते 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहणार असल्यामुळे 3,550 किलोमीटरच्या परिघात नो-फ्लाय झोन घोषित केला आहे. याबद्दल एक ‘नोटॅम’ आणि सागरी सुरक्षा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारताच्या या सूचनेमुळे बंगालच्या उपसागरानजीक येणारी पाकिस्तानमधील शहारांच्या हवाई क्षेत्रात ‘लॉकडाऊन’ची स्थिती दिसून येईल.

बंगालच्या उपसागरात चालू आठवड्यात लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs, अग्नि मालिका क्षेपणास्त्रs किंवा प्रगत सामरिक शस्त्र प्रणालीच्या चाचण्या येथे घेतल्या जाऊ शकतात असे वृत्त आहे. अधिसूचनेत नमूद केलेले निर्देशांक आणि क्षेत्र भारताच्या अग्नि मालिका किंवा क्रूझ आणि हायपरसोनिक वाहन चाचणी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या मोहिमांशी सुसंगत आहे. 2000 किमी पेक्षा जास्त क्षेत्राला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित केल्यामुळे चाचणीमध्ये काही नवीन तंत्रज्ञान किंवा सुधारित मार्गदर्शन प्रणालीचा समावेश असू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

भारताकडून केलेली ही चाचणी केवळ स्वावलंबी संरक्षण क्षमतेला एक नवीन दिशा देण्यासोबतच शत्रूला भारताकडे पाहण्यापासूनही रोखेल. भारत हवाई आणि सागरी वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नियमितपणे नोटॅम जारी करतो. सामान्यत: डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) संयुक्तपणे असे उपक्रम आखत असते. ओडिशा किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी केली जाईल असे वृत्त आहे.

चीन सीमेनजीक वायुदलाचा युद्धाभ्यास

भारतीय वायुदल ईशान्येत स्वत:चा सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरू केला आहे. हा युद्धाभ्यास 25 सप्टेंबरला सुरू झाला असून 16 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यासाठी ‘नोटॅम’ जारी करण्यात आला असून तो आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरच्या मोठ्या हिस्स्यांना व्यापणार आहे. हे क्षेत्र चीनच्या सीमेनजीक असून यात भूतान आणि म्यानमारचे हवाईक्षेत्रही सामील आहे. हा युद्धाभ्यास तब्बल 22 दिवस चालणार असून 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी समाप्त होणार आहे.

ईशान्येचे रणनीतिक महत्त्व

ईशान्य क्षेत्र भारत रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे क्षेत्र चीन, भूतान आणि म्यानमारला लागून आहे. येथे सिलिगुडी कॉरिडॉर सर्वात संवेदनशील असून तो बंगालला आसामशी जोडतो. याचमुळे भारताने या क्षेत्रात स्वत:ची सैन्य उपस्थिती मजबूत केली आहे. त्रिशक्ती कोरला (17 माउंटेन डिव्हिजन) वाढविण्यात आले असून ती ईशान्येत तैनात आहे. तसेच अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा एस-400 तैनात करण्यात आली आहे. हसीमारा वायुतळावर राफेल लढाऊ विमानांची स्क्वाड्रन असून ती या युद्धाभ्यासात भाग घेणार आहे.

युद्धाभ्यासाचे स्वरुप

हा युद्धाभ्यास वायुदलाची मोहिमात्मक कक्षा वाढविण्यावर केंद्रीत असेल, यात संयुक्त एअर-ग्राउंड ऑपरेशन्स असतील, जेथे अनेक वायुतळांवरून फ्रंटलाइन एअरक्राफ्ट म्हणजेच राफेल, सुखोई-30 मिग-29 आणि तेजस सामील होईल. सिलिगुडी कॉरिडॉरचे संरक्षण आणि त्वरित तैनातीचा सराव यात केला जाणार आहे. वायुदल सध्या आधुनिकीकरणाला जोर देत आहे, यात बहुउद्देशीय लढाऊ विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या युद्धाभ्यास केवळ तयारी वाढविणारा नसून आंतरराष्ट्रीय सहकार्यही मजबूत करणार आहे.

Comments are closed.