अमेरिकेसाठी भारत हा एक महत्वाचा देश आहे

पंतप्रधानांच्या भेटीनंतर राजदूत सर्जियो गोर यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांमध्ये ओढाताण सुरू असतानाच अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट देतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक संदेशही दिला. याप्रसंगी द्वयींमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान भारत हा देश अमेरिकेसाठी अतिमहत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सर्जियो गोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची पहिली भेट अद्भुत असल्याचे वर्णन करतानाच अमेरिका भारताशी असलेल्या संबंधांना सर्वाधिक महत्त्व देत असल्याचेही स्पष्ट केले.

अमेरिकेने सर्जियो गोर यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती केल्यानंतर शनिवारी ते येथे दाखल झाले आहेत. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात ते सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. तत्पूर्वी शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सर्जियो गोर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानासह द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. आम्ही महत्त्वाच्या खनिजांच्या महत्त्वावरही चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक महान आणि वैयक्तिक मित्र मानतात. तसेच अमेरिका भारताशी असलेल्या संबंधांना महत्त्व देते, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

पंतप्रधान मोदींनी सर्जियो गोर यांना भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वर याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘भारतात नियुक्त केलेले अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. मला खात्री आहे की त्यांचा कार्यकाळ भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल.’ असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

सर्जियो गोर हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय

डोनाल्ड ट्रम्प यांचे कार्मिक संचालक असलेल्या गोर यांना ऑगस्ट महिन्यात भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण-मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूत म्हणून नामांकित केले होते. सर्जियो गोर हे ट्रम्प यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. दोघांचेही मैत्रीपूर्ण संबंध असून ते अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहेत.   आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जियो गोर या आपल्या विश्वासू सहकाऱ्याला भारतासोबतचे संबंध दृढ करण्याची जबाबदारी दिल्यामुळे द्विपक्षीय संबंध भक्कम केले आहेत.

Comments are closed.