पश्चिम बंगालमध्ये 'आरजी टॅक्स' ची पुनरावृत्ती

ओडिशातील वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार : पीडितेवर रुग्णालयात उपचार

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधून आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. दुर्गापूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वीच्या बहुचर्चित ‘आरजी कर’ घटनेप्रमाणेच घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा एकदा बंगालमधील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पश्चिम वर्धमान जिह्यात ओडिशातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दुर्गापूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसजवळ घडली. येथील महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत जेवण्यासाठी बाहेर पडली असताना काही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले. विद्यार्थिनीवर रात्रीच्या अंधारात महाविद्यालयाजवळील एका निर्जन परिसरात बलात्कार करण्यात आला. ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वैद्यकीय विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात शुक्रवारी रात्री 8 ते 8:30 च्या सुमारास विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत कॅम्पसबाहेर गेली असता ही घटना घडली आहे. तीन अज्ञात आरोपींनी विद्यार्थिनीचा फोन हिसकावून घेत तिला कॅम्पसबाहेरील एका निर्जन ठिकाणी नेले. त्याठिकाणी त्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी हल्लेखोरांकडून देण्यात आल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. आरोपींनी विद्यार्थिनीकडून तिचा मोबाईल फोन परत करण्यासाठी पैसेही मागितले. पोलिसांनी विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला आहे.

‘एनसीडब्ल्यू’चे पथक दुर्गापूरमध्ये दाखल

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाचे (एनसीडब्ल्यू) एक पथक पीडिता आणि तिच्या पालकांना भेटण्यासाठी दुर्गापूरला पोहोचले आहे. बंगालमध्ये महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलीस कोणतीही सक्रिय कारवाई करत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पुढे येण्याची आणि एकत्र काम करण्याची विनंती करेन, असे एनसीडब्ल्यूच्या सदस्या अर्चना मजुमदार यांनी सांगितले. राज्य आरोग्य विभागाने शनिवारी दुर्गापूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून अहवाल मागितला आहे.

Comments are closed.