मल्टिवर्स – भन्नाट कथेचा सुरस अनुभव
>> डॉ स्ट्रेन्ज
सैतानाची कन्या तिच्या राज्याला कंटाळून पृथ्वीवर राहायला आली तर? अशा भन्नाट कल्पनेवर आधारित ‘हाऊ टू बी रिअली बॅड’ हा चित्रपट, त्यातील सुरस आणि मजेदार कथानकामुळे रंगतदार अनुभव मिळतो.
जर्मन भाषेत काही भन्नाट चित्रपट निर्माण होत असतात. असाच एक मस्त चित्रपट म्हणजे `How to Be Really Bad’ होय. देवाने किंवा एखाद्या परीने तिच्या राज्यात कंटाळून पृथ्वीवर येणे आणि मग इथे आलेले त्यांचे चित्र-विचित्र अनुभव असे कथानक आपण अनेकदा पाहिलेले आहे. मात्र प्रत्यक्ष सैतानाची कन्या तिच्या राज्याला कंटाळून पृथ्वीवर राहायला आली तर? याच भन्नाट कल्पनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. प्रत्यक्ष सैतानाची कन्या, तिच्या अंगात असलेला स्वार्थीपणा, अहंकार, इतरांना त्रास देण्याची वृत्ती आणि तिच्या आयुष्यात येणारे वेगवेगळ्या स्वभावांचे व वृत्तीचे मानव यांची सुरस आणि मजेदार कथा पडद्यावर बघताना एक वेगळीच मजा येते.
सैतानाची कन्या असलेली लिलिथ ही अवघ्या 14/15 वर्षांची असली तरी बाप से सवाई असते. स्वतच्या शिक्षकाला बांधून ठेवण्यापासून ते आपल्या पित्याला छळण्यापर्यंत अनेक उद्योग करणे हे तिचे आवडते कार्य. लिलिथला आता आजूबाजूच्या वातावरणाचा कंटाळा यायला लागतो आणि ती पित्याकडे पृथ्वीवर जाण्याचा हट्ट करायला लागते. मात्र आपली कन्या अजून खूप लहान आहे, तिला बाहेरील जगाचा कोणताच अनुभव नाही असे मत असलेला बाप तिच्या मागणीला ठामपणे नाकारतो. मात्र लिलिथच्या हट्टापुढे शेवटी तो हरतो आणि तिला परवानगी देतो. अर्थात त्याने एक अट घातलेली असते, लिलिथने एका आठवडय़ाच्या कालावधीत ग्रेटा या तिच्याच वयाच्या सुस्वभावी मुलीला बिघडवून दाखवायचे असते. जर ती यशस्वी झाली तर तिला पृथ्वीवर राहण्याची पूर्ण परवानगी मिळणार असते.
एक्सचेंज स्टुडंट म्हणून लिलिथ आता ग्रेटाच्या घरी दाखल होते. सुस्वभावी आणि सालस ग्रेटा, तिच्या दोन लहान निरागस बहिणी आणि प्रेमळ आई-वडिलांचे कुटुंब पाहून लिलिथ जाम वैतागते. हे कुटुंब कधी भांडत नसते, आरडाओरडी करत नसते, एकमेकांवर चिडत नसते. उलट सर्व दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या पित्याने आपल्याला किती अवघड कामगिरी दिली आहे हे लिलिथच्या तेव्हा लक्षात येते जेव्हा ती ग्रेटासोबत प्रत्यक्ष वेळ घालवायला लागते. अतिशय साधी सरळ ग्रेटा बिघडवायची कशी हेच लिलिथला कळत नसते. अशातच तिला ग्रेटाच्या कपाटात लपवून सजवलेले एका तरुणाचे फोटो दिसतात आणि तिच्या डोक्यात पुढचा कट शिजायला लागतो.
लिलिथ त्या तरुणाला ग्रेटाला प्रेमात पाडण्यासाठी आणि सातव्या दिवशी तिचा मुद्दाम प्रेमभंग करण्याची कामगिरी देते. त्यासाठी ती त्याला पुष्कळ पैसेदेखील देते. एकीकडे ग्रेटाला बिघडवण्याची कारस्थाने रचत असताना लिलिथ ग्रेटाला तिच्या शाळेतील हुल्लडबाज मुलांपासून वाचवतेदेखील. लिलिथच्या सोबतच शाळेत शिकणारा एक तरुण सॅम्युअल लिलिथचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. मवाली, लहान सहान चोऱया करणारा, वयस्कर लोकांचा अपमान करणारा सॅम्युअल लिलिथला आकर्षित न करेल तरच नवल. लिलिथ सॅम्युअलविषयी जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू लागते. एकदा एका टोळक्यापासून त्याला मार खाताना ती वाचवते आणि दोघांच्यात घट्ट मैत्री होते. चोऱयामाऱया करणे आपल्यालादेखील आवडत नसल्याचे सॅम्युअल तिला सांगतो.
एका बाजूला काहीसा चांगला, काहीसा वाईट स्वभावाचा सॅम्युअल आणि दुसऱया बाजूला आरस्पानी स्वभावाची ग्रेटा यांच्या संगतीत लिलिथला आपले आयुष्य एकदम विचित्र होत असल्याची जाणीव व्हायला लागते. तिला येत जाणारे माणसांचे विविध अनुभव तिची जगण्याची कल्पना बदलायला लागतात. आपल्या सैतानी वृत्तीत होत चाललेले बदल बघून लिलिथ स्वतवरच प्रचंड संतापते. लिलिथ आठवडय़ाच्या शेवटी यशस्वी होते का? ग्रेटाचा प्रेमभंग होतो का? सॅम्युअल आणि लिलिथची मैत्री टिकते का? अशा प्रश्नांची उत्तरे पडद्यावर बघण्याचा आनंद निश्चित चुकवू नका.
Comments are closed.