पहिल्या टप्प्यात पाच राज्यांत सर

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडूचा समावेश : निवडणूक आयोग देशभर टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबविणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोग देशभरात टप्प्याटप्प्याने एसआयआर प्रक्रिया सुरू करू शकते. एसआयआर प्रक्रिया पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांपासून सुरू होणार असल्यामुळे सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच सध्या ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित आहेत किंवा सध्या सुरू आहेत अशा राज्यांमध्ये आयोग मतदारयादी पुनरावृत्ती मोहीम राबवणार नाही. निवडणूक यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्यग्र असल्यामुळे एसआयआरवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

बिहारमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण देशात मतदारयाद्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे.  2026 मध्ये आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांव्यतिरिक्त पहिल्या टप्प्यात काही इतर राज्यांमध्येही एसआयआर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. बिहारमध्ये राजकीय विरोध डावलून निवडणूक आयोगाने मतदारयादी सर्वेक्षणाची मोहीम पूर्ण केली. या सर्वेक्षणाअंती अंदाजे 7.42 कोटी नावे असलेली अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यासंबंधीची माहिती देताना सर्व राज्यांमध्ये मतदारयाद्यांचे सखोल पुनरावलोकन सुरू करण्याचे काम सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. ‘एसआयआर’चे हे काम कधी सुरू करायचे याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना

निवडणूक आयोगाच्या उच्च अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परिषदेत राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) पुढील 10 ते 15 दिवसांत एसआयआर सुरू करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. अंतिम एसआयआरनंतर त्यांच्या राज्यांच्या मतदारयाद्या प्रकाशित ठेवण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिक्रायांना देण्यात आल्या आहेत.

 

Comments are closed.