Taliban vs Pakistan – एअरस्ट्राईकनंतर तालिबानचा पलटवार; पाकिस्तानचे 12 सैनिक ठार, अनेक चौक्यांवर केला कब्जा

पाकिस्तान आणि तालिबानमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर एअरस्ट्राईक केला होता. त्यानंतर तालिबानने जोरदार पलटवार करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ दोन्ही देशांमध्ये घनघोर धुमश्चक्री सुरू झाली आहे.

तालिबानने नंगरहार आणि कुनार प्रांतातील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले आहे. रॉकेट, मोर्टार आणि हेवी मशीनगनद्वारे हल्ले केले जात असून यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या अनेक सैनिकांनी हत्यारं टाकत शरणागती पत्करली. पाकिस्तानच्या काही चौक्यांवर आणि रणगाड्यांवर तालिबानने कब्जा मिळवला आहे. यामुळे तालिबान आणि पाकिस्तानमधील संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये घुसून एअरस्ट्राईक केला होता. यामुळे तालिबानचा पारा चढला आणि हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारी रात्री नंगरहर आणि कुनार प्रांतात तालिबानचे सैन्य घुसले.

तालिबानच्या 201 खालीद बिन वलीद आर्मीने पाकिस्तानच्या चौक्यांवर तुफान गोळीबार केला. सुरुवातीला छोट्या बंदुकींनी गोळीबार सुरू होता, मात्र नंतर रॉकेट, मोर्टार आणि हेवी मशीनगनचा वापर करण्यात आला. यामुळे पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने ‘टोलो न्यूज’ला दिली. तालिबानने कुनार आणि हेलमंद प्रांतातील पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हेलमंद प्रांतातील बहरम चाह जिल्ह्यात तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात हिंसक संघर्ष झाला. यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाले. यावेळी तालिबानने पाकिस्तानच्या रणगाड्यावरही कब्जा केला. तसेच कंधारच्या मायवंद जिल्ह्यातील 5 सैनिकांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केल्याचेही वृत्त आहे.

Comments are closed.