युती शक्य नाही तेथे स्वतंत्र लढणार; मित्रपक्षांवर टोकाची टीका नको – देवेंद्र फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिथे शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करा, अशा सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत. युती करणे शक्य होणार नाही, त्याठिकाणी आम्ही स्वतंत्र लढू. मात्र, स्वतंत्रपणे लढताना मित्रपक्षांवर टोकाची टीका करायची नाही, असे निर्देशही दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, नीलेश घायवळसारख्या प्रवृत्तीला कोणीही थारा देऊ नये. अशाप्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केली जाईल. घायवळला पासपोर्ट देण्यासाठी ज्यांनी चुकीचा अहवाल सादर केला त्यांचीही चौकशी करण्यात येईल. नीलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अॅप्लिकेशन केले होते. यावेळी पोलिसांनी हा व्यक्ती याठिकाणी राहत नाही, असा अहवाल देणे आवश्यक होते; परंतु याचा अहवालात कोठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे घायवळला पासपोर्ट मिळाला व ते पळून जाऊ शकला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले, कोणीच कोणावर वैयक्तिक टीका करू नये, अशा सूचना पडळकर यांना दिल्या आहेत. वैयक्तिक वाद मिटले पाहिजेत यासाठी प्रयत्न केला आहे. मात्र, इतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे होत राहतात.

Comments are closed.