October Heatwave: ऑक्टोबर हीट सुरू, अशी घ्या स्वतःची काळजी; काय सांगतात तज्ञ?
पावसाळा संपला की सर्वच जण हिवाळा सुरू होण्याची वाट पाहत असतात. मात्र त्या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात गर्मी जाणवते. या दरम्यान दिवसभर असलेल्या उन्हामुळे अंगातील उष्णता वाढते परिणामी चिडचिड होते, थकवा जाणवतो, डोकेदुखी, घाम जास्त येणे, त्वचा कोरडी पडणे आणि पचनाचे विविध त्रास होतात. अशा वेळी तुम्ही ‘ऑक्टोबर हीट’ च्या काळात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी? याबाबत तज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया…
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यातील उष्णता कोरडी असते, तर ऑक्टोबर हीट ही पावसानंतर हवेत राहिलेल्या आर्द्रतेमुळे निर्माण होते. या दिवसात तापमान जास्त असतं पण पावसाचा अभाव आणि कमी वाऱ्यांमुळे वातावरण जास्तच त्रासदायक बनते. त्यामुळे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच त्रास होतो.
अशी घ्या काळजी:
या काळात शरीरात उष्णता वाढते म्हणून थंड आणि संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि थकवा कमी करणारे घरगुती उपाय करणे गरजेचे असते.
ऑक्टोबरच्या गरम वातावरणावर मात करण्यासाठी नारळपाणी हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे. ते शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते. त्यात पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे भरपूर असतात त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. रोज एकदा नारळपाणी प्यायल्याने थकवा आणि उष्माघात टाळता येतो.
ताकात थोडं मीठ आणि जिरे घालून प्यायल्यास पचन सुधारते आणि अंगात ताजेपणा येतो. उष्णतेमुळे पचन मंदावते, पण ताकाने पोट थंड राहते.
शरीराचे तापमान कमी करण्यासाठी वारंवार थंड शॉवर, स्पंज बाथ घ्या फळे, भाज्या भरपूर असलेल्या हलक्या जेवणाचे सेवन करा.
या काळात कॅफिन, अल्कोहोल टाळण्याचा प्रयत्न करा. कारण- यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
उन्हामुळे चेहरा गरम आणि लालसर होतो. त्यामुळे गुलाबपाण्यात चंदन पावडर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो.
पुदिन्याची पाने उकळून थंड करून त्याचे पाणी दिवसभर थोडं-थोडं पिणं फायदेशीर ठरते. ते शरीराला आतून थंड करते आणि ताजेतवाने वाटते.
चक्कर येणे, थकवा किंवा तीव्र डोकेदुखी जाणवू लागल्यास, उष्णतेशी संबंधित हे आजार टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Comments are closed.