शेतकऱ्यांच्या कर्ज वसूलीला वर्षभराची स्थगिती हा उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्च्याचा परिणाम – संजय राऊत

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात ‘हंबरडा मोर्चा’ काढला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने जाहीर केलेले 32 हजार कोटींचे पॅकेज म्हणजे इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक आहे अशा शब्दात घणाघात करत सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे हा मोर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जवसूलीला वर्षभराची स्थगिती दिल्याची घोषणा केली. महायुती सरकारने केलेली ही घोषणा हा उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चाचाच परिणाम असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
”या सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकिरडा केलाय. त्याविरोधातच शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढला होता. सरकारने कर्जवसूलीच्या स्थगितीचा जो निर्णय घेतला आहे. तो या मोर्चाचाच परिणाम आहे. उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिल्यानंतर सरकार आता हळू हळू निर्णय घेत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटून निवेदन देणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. ”कामटी, राजूरा मतदारसंघात कसे घोटाळे झाले. याबाबत काही आरोप झाले. आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नाही तर पक्षाचे नेते म्हणून या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा व चर्चेत सहभागी व्हा. निवडणूक आयोगाकडे आम्ही जे निवेदन देणार आहोत या निवेदनात त्यांनी सहभागी व्हावं”. असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी अजित पवारांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, ”अजित पवार यांनी बारामतीत जिंकण्यासाठी बरेच घोटाळे केले आहेत. पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले आहेत, बँका कशा रात्री अपरात्री उघड्या ठेवल्या गेल्या. मतदार याद्यांमधून संशयास्पदरित्या मतदारांना काढणं आणि उभं करणं असे प्रकार झाले आहेत. महाराष्ट्रात सगळ्या मतदारंघात साठ लाख मतदार कसे वाढले हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही जे निवडणूक आय़ोगाला निवेदन देणार आहोत त्यात यावरही चर्चा होणार आहे. त्यामध्ये फडणवीस आणि अजित पवारांनी सहभागी झाले पाहिजे. आताही मतदारयाद्यांसदर्भात, वॉर्ड संदर्भात महानगरपालिकेचा आक्षेप आहे. त्यावर देखील चर्चा होणारच आहे. त्यामुळे यात जर ते सहभागी झाले तर लोकशाही, संविधान अधिक बळकट होईल. अजित पवार हे बाबासाहेबांचं फक्त नाव घेतात. पण संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्यात ते सहभागी होत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
”राहुल गांधी यांनी मतदारांचा अधिकार, व्होटचोरीबाबत देशभरातील घराघरात नेलं आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजप व त्यांचे सहकारी मित्र आणखी काही घोटाळे करू शकतात का याचेही आमचे अभ्यास सुरू आहे. कारण हे सरळ मार्गाने जिंकूच शकत नाही. लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणूका घेतल्या तर ते जिंकणार नाही. निवडणूका निष्पक्ष व्हाव्या यासाठी आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटणार आहोत. त्यामुळे त्यात भाजपने देखील सहभागी व्हावे, देवेंद्र फडणवीसांनी स्वत: सहभागी व्हावे असे आम्हाला वाटते”, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.