आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार संतापले; पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

पुणे – सोलापूर येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात अजित पवार गटीचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा’ असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जगताप यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

अजित पवार म्हणाले, पक्षाची विचारधारा ठरली आहे. तरीदेखील कोणी जबाबदार पदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारची विधानं करत असेल, तर ती पक्षाला मान्य नाही. अरुण जगताप हयात असताना सर्व काही सुरळीत होते. संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीने वागायला आणि बोलायला हवं. याआधी अशा विधानांबाबत त्यांना समज दिली होती, त्यांनी सुधारणा करेन असं सांगितलं होतं, पण ती दिसत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. अजित पवारांच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर जगताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगताप यांच्या या विधानाने अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता ते राष्ट्रवादीच्या विचारसरणीपासून दूर जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जगताप यांनी सोलापुरातील मोर्चात स्पष्ट शब्दांत म्हटलं होतं की, दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने खरेदी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच करावी. सध्या हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले मशिदींमधून होत आहेत. त्यामुळे हिंदू व्यापाऱ्यांनाच आधार द्या. त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापलं असून, विरोधकांनी जगताप यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप केला आहे.

वाद वाढताच जगताप यांनी स्पष्टीकरण देत आणखी वाद पेटवला. ते म्हणाले की, मी धर्म विचारून मारलं असं म्हणालो नाही, पण जर धर्म विचारून मारलं जात असेल, तर धर्म विचारूनच खरेदी करावी, असं मी सांगितलं. यात चूक काय आहे? त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे अजूनच राजकीय खळबळ माजली असून, पवार गटात त्यांच्याविरोधात नाराजी वाढली आहे. त्यामुळे आता अजित पवार याबाबत कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.