टेकऑफनंतर हवेत गोल गोल फिरलं; मग झाडांवर आदळून हेलिकॉप्टर बीचवर कोसळलं, 5 जण जखमी

कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. टेकऑफनंतर हेलिकॉप्टर हवेत गोल गोल फिरलं आणि झाडांवर आदळून बीचवर कोसळलं. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. कॅलिफोर्नियातील हंटिंग्टन बीचवर शनिवारी दुपारी हा अपघात झाला. पॅसिफिक कोस्ट हायवेजवळील अनेक पाम वृक्षांवर हेलिकॉप्टर कोसळले.
दुर्घटनेची माहिती मिळताच हंटिंग्टन बीच पोलीस आणि अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. हेलिकॉप्टरमधून दोघांना बाहेर काढण्यात आले, तर रस्त्यावर असलेले तीन जण जखमी झाले. पाचही जणांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघातात हेलिकॉप्टरचा मागील भाग तुटला. विमान पॅसिफिक कोस्ट हायवेवरून हयात रीजन्सी हंटिंग्टन बीच रिसॉर्ट अँड स्पाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाच्या बाहेरील पायऱ्या आणि पाम वृक्षांमध्ये अडकले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Comments are closed.