‘आरक्षणावर बोला’ म्हणत नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे भाषण बंद पाडले, मातंग समाजबांधवांची जोरदार घोषणाबाजी

अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. आज नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सुरू असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात खासदार अशोकराव चव्हाण यांचे भाषण सुरू होताच प्रचंड घोषणाबाजी केली. ‘आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला’ असे म्हणत त्यांचे भाषण बंद पाडले.
नांदेड जिल्हय़ात अशोक चव्हाण यांना प्रत्येक ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात रोषाला सामोरे जावे लागत आहे. काल बंजारा समाजाने सारखणी येथे चव्हाण यांचा ताफा अडवून घेराव घातला होता. बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत प्रचंड घोषणाबाजी केली होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू होताच लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कैलास सूर्यवंशी, नागोराव कुडके, संभाजी वाघमारे, गणपत रेड्डी, दिनेश सूर्यवंशी, माधव गायकवाड आदी कार्यकर्ते त्यांच्या भाषणाच्यावेळी उभे राहिले आणि ‘अनुसूचित जातीतील आरक्षणात उपवर्गीकरणाची आमची मागणी असून, याबाबत आता मुख्यमंत्र्यांना बोला’, असा अट्टाहास धरून प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे अशोक चव्हाणांना भाषण थांबवावे लागले. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. सभागृहाबाहेर आल्यानंतर देखील या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
बुधवारी मंत्र्यांच्या घरासमोर दवंडी आंदोलन
मातंग समाजावर नेहमी अन्याय होत आहे. आताच मुख्यमंत्र्यांना बोला, वर्षभरापासून आंदोलन करत आहोत, 15 ऑक्टोबरला आमदार व मंत्र्यांच्या घरासमोर दवंडी आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री याकडे लक्ष देत नाहीत, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली.
Comments are closed.