भारताच्या कनिष्ठ संघाने न्यूझीलंडचा पराभव केला
सुलतान जोहोर चषक हॉकी : 4-2 गोलफरकाने विजय
वृत्तसंस्था/ जोहोर, मलेशिया
भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने सुलतान जोहोर चषक स्पर्धेतील अपराजित राहण्याची मालिका पुढे चालू ठेवताना रविवारी न्यूझीलंडवर 4-2 अशा गोलफरकाने विजय मिळविला.
अर्शदीप सिंग (दुसरे मिनिट), पीबी सुनील (15 वे मिनिट), अरायजीत सिंग हुंडाल (26 वे मिनिट), रोमन कुमुर (47 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले तर गस नेल्सन (41 वे मिनिट) व एडन मॅक्स (52 वे मिनिट) यांनी न्यूझीलंडचे गोल केले. भारताने याआधीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला होता.
भारताचा पहिला गोल दुसऱ्याच मिनिटाला अर्शदीपने नोंदवला. न्यूझीलंडच्या सर्कलमध्ये बचावपटूंनी केलेल्या चुकीमुळे अर्शदीपने उजव्या फ्लँकमधून धावत येत त्याला मिळालेल्या चेंडूवर जोरदार फटका लगावला. पण न्यूझीलंडच्या गोलकीपरने तो अडवला. पण रिबाऊंड झालेल्या चेंडूला त्याने गोलची अचूक दिशा देत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिले सत्र संपण्याच्या सुमारास भारताने त्यात आणखी एका गोलाची भर घातली. पेनल्टी कॉर्नरवर हा गोल सुनीलने केला. ड्रॅगफ्लिकर व कर्णधार रोहितने चेंडू सुनीलकडे सोपविला. त्याने स्नॅपशॉट मारत हा गोल नोंदवला.
दुसऱ्या सत्रात भारताने अनेक संधी निर्माण केल्या आणि 26 व्या मिनिटाला सर्कलमध्ये अनमार्क्ड असणाऱ्या अरायजीतने मिळालेल्या चेंडूला गोलच्या दिशेने धाडले. न्यूझीलंडला तिसऱ्या सत्रात पहिले यश मिळाले. 41 व्या मिनिटाला नेल्सनने गोल नोंदवत भारताची आघाडी 3-1 अशी कमी केली. पण शेवटच्या सत्रात 47 व्या मिनिटाला रोशन कुमारने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताची आघाडी पुन्हा 4-1 अशी केली. मॅक्सने 52 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा दुसरा गोल नोंदवला. शेवटच्या काही मिनिटांत न्यूझीलंडने जोरदार प्रयत्न केले. पण भारताने भक्कम बचाव करीत त्यांना संधी मिळू दिली नाही. भारताची पुढील लढत मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध होईल.
Comments are closed.