सत्तेत आल्यानंतर अदानी, अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, काँग्रेस नेत्यांचा निर्धार

ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती ब्रिटिश सरकारपेक्षा प्रचंड वाढल्याने ब्रिटिश सरकारने ती कंपनीच ताब्यात घेतली होती. लष्कराला तेल देण्यास नकार दिल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतला होता तसेच बँकांचेही राष्ट्रीयीकरणही केले. आता 2029 ला काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अदानी व अंबानीच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू, असा दृढनिश्चय काँग्रेस नेत्यांनी आज केला.
टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गरीबांना परवडणारी घरे देण्याऐवजी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अदानी आणि अंबानींना मोक्याच्या जमिनी आंदण देत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. त्यामुळे गरीबांच्या कल्याणासाठी या उद्योगपतींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करायला हवे, असे सपकाळ म्हणाले.
परवडणाऱ्या घरांसाठी काम करणे गरजेचे
मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करणे सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर गेले आहे, सरकार मुंबईतील जमिनी अदानीला विकत आहे आणि सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरे मिळाली पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे आहे. घराचे छप्पर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहेत, घरांसाठी तुम्ही भूमिका ठरवा काँग्रेस तुमच्या पाठीशी असेल, असा विश्वासही सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला. माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी आदी उपस्थित होते.
Comments are closed.