भारत-अफगाणिस्तानच्या संयुक्त विधानाने रागावलेला पाकिस्तान
काश्मीरचा उल्लेख केल्याने आणखीनच जळफळाट : परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ही भेट द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाची असली तरी या भेटीमुळे पाकिस्तान संतापला आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त निवेदनावर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. या निवेदनात काश्मीरचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानचा अधिकच जळफळाट झाला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून काश्मीरला भारताचा भाग म्हणून घोषित करण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन्ही देशांनी संयुक्तपणे मांडलेले विचार म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. जम्मू काश्मीरला भारताचा भाग म्हणून घोषित करणे हे संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे आणि जम्मू काश्मीरच्या कायदेशीर स्थितीचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे पाकिस्तानमधील निवेदनात म्हटले आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे हे संयुक्त निवेदन काश्मीरच्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानांबद्दल अत्यंत असंवेदनशील असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारत आणि अफगाणिस्तानने 10 ऑक्टोबर रोजी संयुक्त निवेदनात 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला होता. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी काश्मीरमध्ये सर्व दहशतवादी कृत्यांचा निषेध करतानाच या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वास वाढवण्याच्या महत्त्वावर भर दिला. तसेच दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या असल्याचे वक्तव्य अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांनी केले होते. तसेच पाकिस्तानने चूक केल्याचे आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. दहशतवादाच्या माध्यमातून अशाप्रकारे समस्या सोडवता येणार नाहीत. आम्ही चर्चेसाठी दार उघडे ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या समस्या स्वत:हून सोडवल्या पाहिजेत. 40 वर्षांनंतर अफगाणिस्तानात शांतता परतली असल्याचा दावाही मुत्ताकी यांनी केला होता. मुत्ताकी यांच्या या विधानांमुळे पाकिस्तान संतापला आहे.
Comments are closed.