आज इजिप्तमध्ये गाझा पीस शिखर परिषद होईल

सहभागासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील 20 बडे नेते उपस्थित राहणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इजिप्तमध्ये आज सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी गाझा शांतता शिखर परिषद होत आहे. आंतरराष्ट्रीय बैठकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शर्म अल-शेख येथे ही शांतता शिखर परिषद होत आहे. या परिषदेसाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष फराह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाझा शांतता कराराच्या स्वाक्षरी समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील 20 नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या परिषदेमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह हे भारताचे प्रतिनिधित्व करतील, असे केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. तथापि, पंतप्रधान मोदी इजिप्तला भेट देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिखर परिषदेसाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना शनिवारी शेवटच्या क्षणी निमंत्रण पाठवण्यात आले होते. हे निमंत्रण भारताने स्वीकारले आहे. भारताने नेहमीच शांतता आणि संयमाला पाठिंबा दिला आहे. भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांशी चांगले संबंध राखल्यामुळे भारताने या शांतता प्रक्रियेत सहभागी होणे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. या शिखर परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली होणार आहे. गाझामधील युद्ध थांबवण्यासह या प्रदेशात स्थिरता आणणे आणि सुरक्षेचा एक नवीन टप्पा सुरू करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

इजिप्तच्या राष्ट्रपती कार्यालयानुसार 20 हून अधिक देशांचे नेते या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या देशांमध्ये स्पेन, जपान, अझरबैजान, आर्मेनिया, हंगेरी, भारत, एल साल्वाडोर, सायप्रस, ग्रीस, बहरीन, कुवेत आणि कॅनडा यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह बडे नेते या परिषदेत सहभागी होतील. इराणलाही आमंत्रित करण्यात आले आहे, परंतु इस्रायल थेट सहभागी होणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

युद्धविराम आणि गाझा पुनर्बांधणी

या शिखर परिषदेचे मुख्य लक्ष इस्रायल आणि हमास यांच्यातील अलिकडच्या युद्धविरामाला बळकटी देणे आणि गाझामध्ये मानवतावादी मदत आणि पुनर्बांधणी प्रयत्नांवर काम करणे हे आहे. या परिषदेत नेते युद्धविरामाला मान्यता देतील आणि गाझामध्ये दीर्घकालीन शांततेसाठी एक रोडमॅप विकसित करतील अशी अपेक्षा आहे. इजिप्त, कतार, तुर्की आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने शर्म अल-शेख येथे तीन दिवस चाललेल्या तीव्र चर्चेनंतर शुक्रवारी युद्धबंदी लागू झाली. पहिल्या टप्प्यात गाझा शहर, रफाह, खान युनूस आणि उत्तर गाझा येथून इस्रायली सैन्याची माघार, पाच मानवतावादी क्रॉसिंग उघडणे आणि ओलिस नागरिक व कैद्यांची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.

Comments are closed.