मेट्रो स्थानकांच्या बाहेर मुंबईकरांना ‘कोंडी’चा ताप, रस्त्यांच्या निम्म्या भागात बॅरिकेड्स, पत्र्यांचे अडथळे

भुयारी मेट्रोमुळे आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंतचा भूमिगत प्रवास वेगवान झाला आहे. मात्र या मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांच्या बाहेरील रस्त्यांवर अर्धवट कामांनी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा मोठा मनस्ताप दिला आहे. रस्त्यांच्या निम्म्या भागात लावलेले बॅरिकेड्स आणि अस्ताव्यस्त पडलेल्या पत्र्यांचा वाहतुकीमध्ये अडथळा येत आहे. याबाबत मेट्रो प्रशासन वा पालिका बेफिकीर असल्याने वाहनचालक आणि पादचाऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या आठवडय़ात भुयारी मेट्रोची संपूर्ण मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. त्यामुळे मुंबईकरांच्या भूमिगत प्रवासाला गती मिळाली आहे. या मेट्रो सेवेमुळे नोकरदार आणि व्यावसायिकांची सोय झाली आहे. मात्र रस्ते प्रवास करणाऱ्या नागरिकांना याच मेट्रो प्रकल्पामुळे ‘कोंडी’चा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानक, मुंबई सेंट्रल येथील जगन्नाथ शंकर शेठ स्थानक, अंधेरीतील मरोळ नाका या मेट्रो स्थानकांजवळ प्रमुख रस्ते आहेत. त्या रस्त्यांवरून मोठय़ा प्रमाणावर गाडय़ांची वर्दळ सुरू असते. आचार्य अत्रे चौक आणि मरोळ नाका यांसारखी दुसऱया टप्प्यातील स्थानके प्रवासी सेवेसाठी खुली होऊन पाच महिने उलटले तरी या स्थानकांच्या आवारातील रस्त्यांच्या निम्म्या भागांत मेट्रो प्रशासनाच्या अर्धवट कामांचे अडथळे ‘जैसे थे’ आहेत. परिणामी, या भागात दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. वरळी नाका परिसरात नागरिकांचे हाल होत आहेत. वरळी नाका परिसरात महालक्ष्मी, कोस्टल रोड, लोअर परळ, दादरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. मेट्रोच्या अर्धवट कामांमुळे या भागात 500 मीटरच्या प्रवासासाठी वाहनचालकांची 20 ते 30 मिनिटे रखडपट्टी होत आहे.
Comments are closed.