रविवार लटकवार… ‘परे’वर तांत्रिक लोच्या; विरार-डहाणू लोकल दोन तास ठप्प

पश्चिम रेल्वेवर आज लोकल सेवेचा बोजवारा उडाला. विरार-डहाणू रेल्वे मार्गावर दुपारी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दोन तास लोकल सेवा ठप्प झाली. विरार आणि वैतरणा स्थानकांच्या अप आणि डाऊन दिशेला एकामागोमाग एक लोकल आणि मेल एक्स्प्रेस थांबून होत्या. तांत्रिक बिघाडामुळे रविवार ल टकवार ठरल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विरार स्थानकावरून दुपारी ३.४५ वाजता डहाणूच्या दिशेने सुटलेली लोकल वैतरणा स्थानकादरम्यान बंद पडली. बीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर ५.४५ वाजता लोकल सेवा पूर्वपदावर आली.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल खोळंबा हे पश्चिम रेल्वेवर नित्याचेच झाले आहे. सततच्या यांत्रिक बिघाड, पेंटाग्राफ तुटणे, सिग्नलमध्ये बिघाड, रुळावरून गाडी घसरणे या कारणाने गाड्यांना होणारा विलंब यामुळे प्रवासी कमालीचे त्रासले आहेत. त्यातच आज सुट्टीच्या दिवशी दुपारी लोकल सेवेचे तीनतेरा वाजले. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी विरार स्थानकावरून डहाणूच्या दिशेने सुटलेली लोकल काही अंतरावर गेल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वैतरणा स्थानकाच्या मागे थांबली. अर्धा तास उलटूनही लोकल सुरू होत नसल्याने प्रवासी कमालीचे त्रासले होते. प्रचंड गर्दी आणि उकाडा यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ झाले होते.

ट्रॅकवर उतरून स्थानक गाठले

लोकल एकाच जागी तासभर थांबून असल्याने अनेक प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरून जवळचे स्थानक गाठले. तांत्रिक बिघाड दूर होण्यास तब्बल दोन तास लागले. ५ वाजून ४५ मिनिटांनी लोकल सुरू झाली. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र या बिघाडाचा परिणाम विरार डहाणू मार्गावरील लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला.

महामार्ग, रो रो सेवेवर ताण

नेमका बिघाड आणि गाड्यांना होणारा विलंब याबाबत रेल्वेकडून काहीच उद्घोषणा होत नसल्याने विरार, वैतरणा, सफाळे पालघर, बोईसर, डहाणू आदी स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती. एक तास होऊनही लोकल येत नसल्याने अनेकांनी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी रस्ते आणि रो रो सेवेचा आधार घेतला. अचानक गर्दी वाढल्याने महामार्ग आणि रो रो सेवेवर ताण येऊन वाहतूककोंडीत भर पडली.

Comments are closed.