भाज्यांची आवक घटली… हिरवी मिरची, सिमला मिरची, आले, फ्लॉवर महागले

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली होती. आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, आले, फ्लॉवर, गाजरच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर सर्वप्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि.१२) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू येथून शेवगा ३ टेम्पो, तामीळनाडू येथून तोतापुरी कैरी ३००-३५० क्रेट, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४, कर्नाटक-गुजरात येथून भुईमूग ४ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो, तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४५ ते ५० टेम्पो इतकी आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४५०-५०० गोणी, भेंडी ४ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, मटार ४०० गोणी, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा सुमारे ९० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

पालेभाज्यांचे तेजीतील भाव टिकून पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. तुलनेने मागणी जास्त आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेले पालेभाज्यांचे भाव टिकून होते. गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि.१२) कोथिंबिरीची सुमारे १ लाख ५० हजार जुडी, तर मेथीची ३० हजार जुडींची आवक झाली होती.

फुलांचे भाव स्थिर

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात सर्वप्रकारच्या फुलांची आवक रविवारी घटली होती. मात्र, सर्व प्रकारच्या फुलांना मागणीदेखील कमी प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातील सर्वप्रकारच्या फुलांचे भाव टिकून होते, अशी माहिती मार्केटयार्ड फुलबाजार आडते असोसिएशनचे समन्वयक सागर भोसले यांनी दिली

कलिंगड महाग; पपई झाली स्वस्त

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात बहुतांश सर्व फळांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. सध्या पहाटे थंडी आणि दुपारी गरमी अशा वातावरणामुळे कलिंगड, खरबूज आदी फळांना मागणी वाढली आहे. आवक कमी झाल्याने कलिंगडाच्या दरात किलोमागे २ ते ५ रुपयांनी वाढ झाली होती. तर, आवक वाढल्याने पपईच्या भावात काहीशी घसरण झाली होती. इतर सर्वप्रकारच्या फळांचे भाव स्थिर होते.

Comments are closed.