प्रशांत किशोर यांच्याविरूद्ध खटला नोंदविला गेला

आचार संहिता उल्लंघनामुळे अडचणीत

वृत्तसंस्था/ राघोपूर

बिहार विधानसभा निवडणुकीवरून हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान आता प्रशांत किशोर यांच्यासमोर कायदेशीर समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. जनसुराज पक्षाचे सूत्रधार प्रशांत किशोर यांच्यावर आदर्श आचार संहिता उल्लंघनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिहारच्या राघोपूर येथे हा गुन्हा नोंद झाला आहे.

प्रशांत किशोर शनिवारी स्वत:च्या ताफ्यासोबत वैशाली जिल्ह्यातील राघोपूर येथे गेले होते, ज्यानंतर आता प्रांताधिकारींच्या अर्जानुसार प्रशांत किशोर यांच्या विरोधात आचार संहिता उल्लंघनप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. प्रशांत किशोर समवेत विभाग अध्यक्ष आणि अन्य अज्ञातांच्या विरोधात राघोपूर पोलीस स्थानकात एफआयआर नोंद झाला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एकीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ आणि विरोधी पक्षांच्या महाआघाडीत अद्याप जागावाटप अंतिम झालेले नसताना जनसुराज पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी शनिवारी राजद नेते तेजस्वी यादव यांचा मतदारसंघ राघोपूर येथून प्रचार अभियानाची सुरुवात केली आहे.

राघोपूर येथे बोलताना किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्या ‘एकाहून अधिक जागांवर निवडणूक लढविण्याच्या’ चर्चेवर टिप्पणी केली. तेजस्वी यादव यांची अवस्था बहुधा त्यांचे सहकारी राहुल गांधींप्रमाणे होणार आहे. राहुल गांधी हे 2019 मध्ये वायनाड येथे जिंकले परंतु स्वत:चा पारंपरिक मतदारसंघ अमेठीत पराभूत झाले होते अशी आठवण किशोर यांनी करून दिली आहे.

राघोपूर मतदारसंघात 47 वर्षीय प्रशांत किशोर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. समर्थकांनी ढोल वाजवत फुलांनी त्यांचे स्वागत केले. हा भाग पाटण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर गंगेच्या पलिकडील काठावर असून हा तेजस्वी यादव यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. मागील काही वर्षांपासून पदयात्रा काढून बिहारच्या गावागावांमध्ये जात राहिलेले माजी निवडणूक व्यूहनीतिकार किशोर यांनी मतदारसंघातील अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी लोकांनी शिक्षणसुविधा, रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी प्रशांत किशोर यांच्या समोर केल्या आहेत.

Comments are closed.