मला टीम इंडियाला सर्वात यशस्वी संघ नव्हे तर सर्वात खतरनाक, निडर टीम बनवायची आहे: गौतम गंभीर


गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले होते. भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातातून शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आली होती. यापूर्वी शुभमन गिल (Shubhman Gill) याच्याकडे भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे आता त्याच्याकडे कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन प्रकारांमध्ये कर्णधारपद असेल. मात्र, बीसीसीआय आणि प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद मात्र सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दिले होते. त्यामुळे शुभमन गिल याला या फॉर्मेटमध्येही कर्णधार का करण्यात आले नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर गौतमी गंभीर याने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले. ट्वेन्टी-20 किंवा एकदिवसीय व कसोटी संघ हे माझे राहिलेले नाहीत. तर ते सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचे आहेत, असे गंभीरने म्हटले.

ट्वेन्टी-20 क्रिकेटला ज्याप्रकारची देहबोली आणि व्यक्तिमत्त्वाची गरज असते तसेच गुण सूर्यकुमार यादव याच्याकडे आहेत. सूर्यकुमार यादव हा स्वत: मुक्तपणे वावरतो. मग मधल्या फळीतील कोणत्याही क्रमांकावर येऊन फलंदाजी करणे असो किंवा मैदानाबाहेरही सूर्यकुमार यादव हा खूप मोकळेपणाने वावरतो. ट्वेन्टी-20 क्रिकेटही अशाचप्रकारचे आहे, त्यामध्ये तुम्ही जसे आहात तसे व्यक्त होणे गरजेचे असते. मैदानाबाहेर तुमचा स्वभाव जसा असतो, तसेच तुमचे ऑन फिल्ड व्यक्तिमत्व असते. ड्रेसिंग रुममध्येही तसेच वातावरण असते. सूर्यकुमार यादव याने गेल्या वर्षभरात ड्रेसिंग रुममध्ये ज्याप्रकारचे वातावरण ठेवले आहे त्याचे परिणाम तुम्हाला दिसत आहेत. ट्वेन्टी-20 क्रिकेट हे ‘जितका जास्त धोका, तितका जास्त फायदा’, या उक्तीप्रमाणे आहे, असे गौतम गंभीर याने म्हटले.

Gautam Gambhir on Team India: आपल्याला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी नव्हे तर निडर संघ व्हायचे आहे: गौतम गंभीर

सूर्यकुमार यादव आणि माझी जेव्हा पहिल्यांदा चर्चा झाली तेव्हा मी सांगितले की आपण हारण्याच्या भीतीने खेळायचे नाही. मला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील यशस्वी प्रशिक्षक वगैरे व्हायचे नाही. त्याऐवजी आपल्याला सर्वात निडर संघ म्हणून प्रतिमा निर्माण करायची आहे. जर मी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ व्हायचा विचार केला तर संघातील खेळाडूंवर आपोआप त्याचा दबाव येईल. सामना जितका हायप्रेशर असतो तितकं निडर आणि आक्रमक क्रिकेट तुम्हाला खेळणे गरजेचे असते. अशा सामन्यांमध्ये कोणतीही चूक करायची नाही, ही भीती बाळगण्याची गरज नाही. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही सूर्यकुमार यादव आणि माझ्यात हेच बोलणे झाले. भारत-पाकिस्तान सामना असल्यामुळे या सामन्याची मोठ्याप्रमाणावर वातावरणनिर्मिती झाली होती. मी तेव्हा भारतीय खेळाडूंना म्हणालो की, तुमच्याकडून एखादा झेल सुटला तरी चालेल किंवा तुम्ही एखादा खराब फटका मारलात अथवा खराब चेंडू टाकलात तरी त्यामध्ये काही वावगे नाही. तुमच्याकडून चूक झाल्यानंतर त्याचा विचार करत बसू नका. तुमच्यासाठी फक्त ड्रेसिंग रुममधील 30 जण काय विचार करतात, त्यांचेच मत महत्त्वाचे आहे. बाकीचे लोक काय विचार करतात, हे महत्त्वाचे नाही कारण आपण मैदानावर ज्या दबावातून जातो, तो दबाव त्यांनी अनुभवलेला नसतो, असे गौतम गंभीर याने म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=xpzkhnevlao

आणखी वाचा

गौतम गंभीरने कर्णधारपद काढून घेतलं, रोहित शर्माने सर्वांदेखत अनुल्लेखाने मारलं, मुंबईतील सोहळ्यात काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.